उमेदवार याद्यांची प्रतीक्षाच
By Admin | Updated: January 28, 2017 00:14 IST2017-01-28T00:14:31+5:302017-01-28T00:14:31+5:30
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे

उमेदवार याद्यांची प्रतीक्षाच
पुणे : महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांपैकी एकाही पक्षाची उमेदवारी यादी अद्याप जाहीर झालेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी तसेच राजकीय खेळीचा एक भाग म्हणून उमेदवारी यादी जाहीर होण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र उमेदवारी यादी जाहीर होण्यास जसा विलंब होत आहे तसे इच्छुकांची धाकधूक मात्र चांगलीच वाढत चालली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपा व शिवसेना युती होणार नाही हे स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये मात्र अजून आघाडीची बोलणी सुरू आहेत. शनिवारपर्यंत आघाडीचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपाच्या कार्ड कमिटीने उमेदवारांची नावे निश्चित करून त्या नावांची यादी प्रदेश पातळीवर पाठवून दिली आहे. शुक्रवारी उमेदवारांच्या निश्चितीसाठी राज्य कार्यकारिणीची मुंबईत बैठक झाली. कार्यकारिणीकडून उमेदवारांची यादी अंतिम झाली तरी इतक्यात यादी जाहीर होणार नाही असे बोलले जात आहे. भाजपाकडे एका जागेसाठी अनेक इच्छुकांचे अर्ज आले आहेत, त्यामुळे बंडखोरी टाळणसाठी यादी उशिरा जाहीर केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत, शनिवारपर्यंत त्याचे चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी, ३० जानेवारी रोजी जाहीर होईल.