दिवसा वेटर अन् रात्री दरोडेखोर

By Admin | Updated: February 11, 2016 03:07 IST2016-02-11T03:07:55+5:302016-02-11T03:07:55+5:30

दिवसा चायनीज हॉटेलांमध्ये वेटरचे काम आणि रात्री लूटमार करणाऱ्या नेपाळी तरुणांच्या टोळीला, दरोड्याच्या तयारीत असताना पिंपरी पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून

The wait day and night the robber | दिवसा वेटर अन् रात्री दरोडेखोर

दिवसा वेटर अन् रात्री दरोडेखोर

पिंपरी : दिवसा चायनीज हॉटेलांमध्ये वेटरचे काम आणि रात्री लूटमार करणाऱ्या नेपाळी तरुणांच्या टोळीला, दरोड्याच्या तयारीत असताना पिंपरी पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, तसेच दरोड्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांचा म्होरक्या राकेश फरार झाला आहे.
पोलीस कर्मचारी चपाईतकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीच्या मागावर पोलीस पथक होते. पाच ते सहा जणांचे टोळके केएसबीकडून मोरवाडीकडे जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाजवळ दबा धरून थांबले होते. त्यांना पोलिसांनी जेरबंद केले. प्रेम अमर सुनाडी (वय १९), लोकेश दीपक ठाकूर (वय १९), मंगल लालबहादूर परिहार (वय १९), लक्ष्मण ऊर्फ लकी शंकर कामी (वय २१), सागर बिरबहादूर दमाई (वय २४), सागर बिरबहादूर दमाई (वय २४, सर्व मूळचे नेपाळ, सध्या रा. डांगे चौक, वाकड) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पिंपरी, चिंचवड, वाकड, हिंजवडी, भोसरी परिसरात रात्री नागरिकांची लूटमार, तसेच घरफोड्या करून त्यांनी दहशत पसरवली होती. त्यांच्याकडून ३ कुकरी, एक चॉपर, एक चाकू, मिरची पावडर, नायलॉन दोरी, मोबाइल, तसेच दोन दुचाकी असा ८३ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला.
परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, विश्वजित खुळे, बुचडे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)

नेपाळी तरुणांची टोळी
दिवसा चायनीज हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारे नेपाळी तरुण रात्री मात्र रस्त्यावर एकट्या नागरिकास अडवून लुबाडणूक करत होते. घरफोड्या, दरोडे टाकत होते. दरोड्याच्या तयारीत असताना, ते पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे त्यांचे गुन्हेगारी कृत्य उघडकीस आले. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: The wait day and night the robber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.