वाघोली-शिक्रापूर मार्ग होणार सहापदरी, २६ किलोमीटरसाठी २२२.२४ कोटी रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:20 IST2018-09-28T00:20:20+5:302018-09-28T00:20:50+5:30
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हायब्रिड अॅम्युनिटीअंतर्गत पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाघोली ते शिक्रापूर या २६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाला मान्यता दिली आहे.

वाघोली-शिक्रापूर मार्ग होणार सहापदरी, २६ किलोमीटरसाठी २२२.२४ कोटी रुपये मंजूर
कोरेगाव भीमा - राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हायब्रिड अॅम्युनिटीअंतर्गत पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाघोली ते शिक्रापूर या २६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाला मान्यता दिली आहे. यामुळे महामार्गावरील प्रवाशांसह औद्योगिक कारखान्यांतील कामगारांची वाहतूककोंडीतून येत्या काळात सुटका होणार आहे.
यासाठी राज्य सरकारने हायब्रिड अॅन्युईनिटीअंतर्गत सहापदरीसाठी सुमारे २२२.२४ कोटी रुपयेही मंजूर केले. परंतु, या कामासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. पाचर्णे व शिरूर बाजार समितीचे संचालक राहुल गवारे यांच्या पाठपुराव्यानंतरदेखील मिळाले. अखेर १७ सप्टेंबर २०१८ ला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावर हायब्रिड अॅन्युईटीअंतर्गत रस्त्याचे काम करण्यास राज्य सरकारला परवानगी दिली. ‘या रस्त्याच्या सहापदरीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून त्या कामाची निविदा प्रक्रियाही येत्या ८-१० दिवसांत सुरू होणार आहे,’ असे राहुल गवारे यांनी सांगितले.
सहापदरीकरणाच्या या कामामुळे पुणे-शिरूर रस्त्याच्या वाहतूककोडींचा प्रश्नही आता सुटणार आहे. औद्योगिक परिसरात काम करणारे कर्मचारी आणि व लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही याचा फायदा मिळणार आहे.
अशी फुटली निर्णयाची कोंडी...
ही वाहतूककोंडी सुटावी, यासाठी शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी पाठपुरावा केला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारने हायब्रिड अॅम्युनिटीअंतर्गत १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पुणे ते शिरूर या ५२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ४६२ कोटी रुपये मंजूर केले. या कामासाठी २८ जून २०१७ रोजीच्या आदेशानुसार सी. व्ही. कांड कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांची प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाची किंमत वाढून तो ७८३ कोटींचा झाला. याबाबतचा प्रकल्प अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या कार्यकारी अभियंत्यांना सादरही करण्यात आला. त्यामध्ये वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव अशा अनेक ठिकाणी उड्डाणपुलाची तरतूद होती. मात्र, ३ जानेवारी २०१७ ला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला. यामुळे राज्य सरकारने पुणे-शिरूर रस्त्याचे काम रद्द केले. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामास विलंब लागणार असून त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा प्रश्न चिघळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. अखेर पाटील यांनी या मार्गाचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेतला.