वाघजाई नगरचा कचरा डेपो हलवला नाही, तर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 19:22 IST2018-01-07T19:22:11+5:302018-01-07T19:22:19+5:30
खराबवाडी गावच्या हद्दीतील वाघजाईनगर येथील दगड खाणीतील कचरा डेपो त्वरित हलविला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाघजाईनगर व खराबवाडीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

वाघजाई नगरचा कचरा डेपो हलवला नाही, तर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
चाकण : खराबवाडी गावच्या हद्दीतील वाघजाईनगर येथील दगड खाणीतील कचरा डेपो त्वरित हलविला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाघजाईनगर व खराबवाडीच्या ग्रामस्थांनी दिला आहे. येथील डेपो हलविण्यासाठी येथील ग्रामस्थ व खराबवाडी ग्रामपंचायतने अनेकदा तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून वाघजाईनगर येथे परिसरातील ग्रामपंचायती व चाकण एमआयडीसीतील औद्योगिक कंपन्या बेकायदेशीरपणे कचरा टाकीत आहेत. येथील ग्रामपंचायत, वाघजाईनगर व खराबवाडीचे ग्रामस्थ यांनी अनेकदा कचऱ्याच्या गाड्या अडविल्या, आंदोलने केली व शासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने दिली, पण प्रत्यक्ष कारवाई किंवा अंमलबजावणी न करता फक्तच आश्वासने मिळत गेली.
हा कचरा डेपो हलविण्यासाठी १८ ऑक्टोबर २०१२ रोजी तहसील कार्यालयासमोर खराबवाडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे व ग्रा. पं. सदस्य राहुल शेलार यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण केले होते, ग्रामस्थांनी तर त्यावेळी तहसील कार्यालयासमोर भजन करून आंदोलन छेडले होते.
त्यावेळी तहसीलदारांनी हा प्रश्न ३ महिन्यात मार्गी लावतो असे आश्वासन दिले होते; परंतु हा प्रश्न मार्गी तर लागलाच नाही उलट कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील कंपनीच्या कामगार व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. खाणीत पाणी साचून दुर्गंधी सुटली आहे. खाणीत पाणी असूनही वापरता येत नाही, हे पाणी जनावरे पीत असल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील दुर्गंधी व केमिकलयुक्त पाणी जमिनीत झिरपून आजूबाजूच्या बोअरवेल व विहिरींमध्ये उतरून पिण्याचे पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजार निर्माण झाले आहेत. हवा दूषित झाली आहे. हा कचरा डेपो त्वरित हलविला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष शिळवणे, सरपंच सागर खराबी, उपसरपंच रोहिदास शिळवणे, माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे, उद्योजक तुकाराम शिळवणे, जीवन खराबी, शाखा प्रमुख पांडुरंग शिळवणे, सर्व ग्र.पं. सदस्य व ग्रामस्थांनी दिला आहे.