पुणे : महापालिका निवडणुकीच्या १६२ जागांसाठी मंगळवारी बोगस मतदानाच्या तक्रारी, मतदारांच्या प्रभागांची अदलाबदली, तीन मतदान यंत्रांमुळे मतदारांचा उडत असलेला गोंधळ, बोटांवरची शाई जाणे आदी प्रकार मतदानाच्या दरम्यान घडले. मात्र हाणामारी, वादविवाद असे प्रकार न घडता व कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले होते, सायंकाळी सात वाजले तरी काही केंद्रांवर मतदान सुरू होते.महापालिका निवडणुकीसाठी ३४३१ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पहिल्या दोन तासांमध्ये मतदानासाठी येणाऱ्या मतदानाचा ओघ कमी होता. पहिल्या दोन तासांमध्ये १० टक्के इतके मतदान झाले. एका प्रभागातील ४ गटांसाठी ३ किंवा २ मतदान यंत्रे असल्याने अनेक मतदार गोंधळून जात होते. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन त्यांना मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागत असल्याचे दिसून येत होते. अशिक्षित मतदारांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला असल्याचे दिसून आले. या गोंधळामध्ये गुप्त मतदानाच्या संकल्पनेला मात्र पूर्णपणे हरताळ फासला गेला.बोगस मतदान झाल्याच्या असंख्य तक्रारी अनेक मतदान केंद्रांवर आढळून आल्या. आपल्या नावावर दुसरेच कोणीतरी मतदान करून गेल्याचे दिसून आल्यानंतर त्यांच्या नाराजीला मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यांना दुसरी मतपत्रिका देऊन त्यावर मतदान करू देण्यात आले. कोंढव्यामध्ये बोगस मतदानासाठी आलेल्या ७ गाड्या पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतल्या. महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला आल्यानंतर अनेक मतदारांचे प्रभागच बदलले गेले असल्याचे, तसेच काहींची नावेच मतदारयादीतून गायब झाले असल्याचे आढळून आले. यामुळे मतदारांना मोठी धावाधाव करावी लागली. मात्र आपण राहत असलेल्या प्रभागाऐवजी दुसऱ्याच प्रभागात मतदानाचा हक्क बजावावा लागल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच पालिकेच्या कॉल सेंटरवरून नाव शोधून अखेर मतदारांनी मतदान केले. त्याचबरोबर अनेकांनी मतदारयादीत नाव मिळाले नसल्याने मतदान न करताच घरी परत जाणे पसंत केले. यामुळे त्याचाही मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. महापालिका प्रशासनाकडून मंगळवारी बुथनिहाय मतदारयादी जाहीर करण्यात आली. त्यानंतरच अनेक ठिकाणी प्रभागातील मतदारांच्या अदलाबदली झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येण्यास सुरुवात झाली होती. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशीही हाच प्रकार दिसून आला.अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे त्रास : उल्हास पवारप्रभाग पद्धतीमुळे अनेक मतदारयाद्यांची मोडतोड केल्याने तसेच मतदान केंद्रावर अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला़ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनाही त्याचा अनुभव आला़ त्यांनी आपली ही व्यथा, वेदना ‘लोकमत’कडे बोलून दाखविली़ पवार म्हणाले, की सहकारनगरमध्ये आमचे मतदान हे घरासमोरील शाळेत असते़ यंदा तेथून दूर असलेल्या अरण्येश्वर मंदिरापलीकडील विद्या विकास शाळेमध्ये ठेवले होते़ त्यामुळे आमच्या परिसरातील अनेकांना इतक्या लांबवर जाऊन मतदान करावे लागले़ कोठेही कोणते मतदान कोठे आहे, याची माहिती देणारा फलक लावण्यात आला नव्हता़ तेथील कर्मचाऱ्याला कशाचेही ज्ञान नसल्याचे दिसून आले़ मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रचार करायचा आणि वर्षानुवर्षे ज्या घराजवळच्या मतदान केंद्रावर मतदान करत आलो, त्यांचे मतदान केंद्र बदलायचा़ त्यांना मतदान करताना त्रास होईल, अशी कार्यपद्धतीने ठेवल्याने मतदानाची टक्केवारी कशी वाढणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ संपत्तीने विस्फारले डोळे४मतदान केंद्रांच्या बाहेर यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांची संपत्ती, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे याची माहिती असलेले बोर्ड लावण्यात आले होते. त्यामध्ये अनेक उमेदवारांच्या संपत्तीची माहिती वाचून अनेक मतदारांचे डोळे विस्फारत होते. बोर्डावर लावण्यात आलेल्या माहितीची चांगलीच चर्चा मतदारांमध्ये रंगली होती.
मतदार २-३ मतदान यंत्रांमुळे संभ्रमात
By admin | Updated: February 22, 2017 03:39 IST