कोरोना नियमांचे उल्लंघन,चार लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:05+5:302021-04-01T04:12:05+5:30
खेड तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने चाकण शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौक, तळेगाव चौक तसेच महात्मा फुले व ...

कोरोना नियमांचे उल्लंघन,चार लाखांचा दंड वसूल
खेड तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने चाकण शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौक, तळेगाव चौक तसेच महात्मा फुले व माणिक चौकात दुचाकी व चारचाकीमधून विनामास्क फिरणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दंडत्माक कारवाई सुरू केली आहे. त्यांनी सांगितले की, ही कारवाई रोजच चालणार असून कोणीही विनामास्क घराबाहेर पडू नये अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
चाकण पंचक्रोशीत मोठे औद्योगिक क्षेत्र असल्याने याच भागातून कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात मिळून येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
एमआयडीसीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आदी भागातून अनेक कामगार रोज येजा करत असतात. तसेच अनेक कंपन्यांमध्ये मास्क, सॅनिटाझर आदी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचा गैरवापर केला जात आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून पर्यायाने रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर ही धडक कारवाई करण्यात येत आहे.
जमावबंदीचा आदेश असतानाही चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईकृपा मंगल कार्यालय, मातोश्री मंगल कार्यालय, राधे सेल्स, द्वारका स्वीट्स, हॉटेल राजरत्न, हॉटेल जगदंब, पाटलाचा ढाबा, हॉटेल दुर्वांकुर, हॉटेल तुळजाभवानी, भंडारी सेल्स, समाधान बिअर बार या आस्थापनांवर सुरू तसेच जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी उपस्थितीत लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. चाकण पोलिसांच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या ७३८ केसेस करण्यात आल्या असून तब्बल ४ लाख २ हजार रुपये दंड वसूल केला आहे.