कुंभारवळणच्या ग्रामस्थांनी कचरागाड्या पुन्हा अडविल्या

By Admin | Updated: February 6, 2016 01:42 IST2016-02-06T01:42:02+5:302016-02-06T01:42:02+5:30

शासनाने सासवड नगरपरिषदेला घनकचरा प्रकल्पासाठी कुंभारवळण गावच्या हद्दीत दिलेल्या जागेत पालिकेने प्रकल्प उभारला आहे.

Villages of Kavalavalavan re-opened the garbage dumps | कुंभारवळणच्या ग्रामस्थांनी कचरागाड्या पुन्हा अडविल्या

कुंभारवळणच्या ग्रामस्थांनी कचरागाड्या पुन्हा अडविल्या

सासवड : शासनाने सासवड नगरपरिषदेला घनकचरा प्रकल्पासाठी कुंभारवळण गावच्या हद्दीत दिलेल्या जागेत पालिकेने प्रकल्प उभारला आहे. मात्र स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पास तीव्र विरोध आहे. नगरपरिषद प्रशासनाने आज (दि. ५) पुन्हा कुंभारवळणच्या प्रकल्पाकडे घनकचऱ्याच्या गाड्या पाठविल्या असता तेथील स्थानिक नागरिकांनी या गाड्या अडवून सासवडला परत पाठविल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.
हरित न्यायालयाने कुंभारवळण येथेच कचरा प्रकल्प सुरू करावा. याबाबतचे आदेश सासवड नगरपरिषदेला दिले आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने कुंभारवळण येथील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कुंभारवळण व परिसरातील ग्रामस्थांची बैठक काही महिन्यांपूर्वी बोलावली होती. पालिका प्रशासनाने हा कचरा डेपो नसून घनकचरा प्रकल्प असल्याचे सांगितले होते. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे बैठकीत काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर सासवड येथील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांची कुंभारवळण व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बैठक झाली होती. यामध्ये प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनीदेखील हा कचरा डेपो नसून घनकचरा प्रकल्प असल्याचे सांगत एक वेळ याचे प्रात्यक्षिक करावे व त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी मागणी केली होती. परंतु, त्या वेळीही सदरच्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर मात्र पुन्हा याबाबत बैठक झाली नव्हती.
दरम्यान, आज पुन्हा सासवड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या दोन कचरागाड्या कुंभारवळण येथील प्रकल्पाकडे आज जात असताना येथील सरपंच अमोल कामथे यांनी ग्रामस्थांसह गाड्या अडविल्या व चाकांतील हवा सोडून दिली. याप्रसंगी पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, गणेश मोरे, बाबूराव कामथे, आत्माराम कामथे, मारुती भोसले यांसह गावांचे प्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Villages of Kavalavalavan re-opened the garbage dumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.