रासायनिक प्रकल्पांचा गावांना त्रास,प्रशासकीय, राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:35 IST2018-03-19T00:35:20+5:302018-03-19T00:35:20+5:30
रासायनिक प्रकल्पातील अनेक घटना या काही अंशी दुर्दैवी जरी असल्या, तरी त्या मानवनिर्मितच आहेत. जवळपास तीस वर्षांपासून उभा राहिलेल्या या प्रकल्पाला सर्वच स्तरातून दुर्लक्षित केले गेले आहे.

रासायनिक प्रकल्पांचा गावांना त्रास,प्रशासकीय, राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित
कुरकुंभ : येथील रासायनिक प्रकल्पातील अनेक घटना या काही अंशी दुर्दैवी जरी असल्या, तरी त्या मानवनिर्मितच आहेत. जवळपास तीस वर्षांपासून उभा राहिलेल्या या प्रकल्पाला सर्वच स्तरातून दुर्लक्षित केले गेले आहे. परिणामी, त्याचे दुष्परिणाम कुरकुंभ, पांढरेवाडी व परिसरातील गावांना सोसावे लागले.
मात्र, हा त्रास सहन करत असताना अनेक आमदार, खासदार, मंत्री विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी त्यांचा त्रास फक्त पाहण्यापलीकडे काहीच केले नाही, असेच म्हणावे लागेल. अनेक वर्षांपासून या प्रकल्पात अनेक सामान्य कामगारांच जीव गेलेला आहे. मात्र, त्याची गंभीर दखल घेण्यात टाळाटाळ करून आपली आर्थिक पोळी शेकून घेण्यापलीकडे आजपर्यंत काहीच झालेले नाही हे वास्तव आज कुरकुंभ येथे आल्यावर माहीत पडते.
कुरभावी पिढीसाठी आपण काहीतरी करीत आहोत. या भावनेतून ज्या लोकांनी हा निर्णय घेतला तो निर्णय कदाचित काही अंशीच खरा ठरला कारण जी स्वप्ने दाखवून हा प्रकल्प उभारला गेला त्याची अवस्थादेखील अन्य प्रकाल्पासारखीच झाली. जमिनी गेल्या व वाट्याला आला तो रासायनिक प्रक्रियेचा घातक दुष्परिणाम, हाताला काम नाही व कसायला जमिनीच उरल्या नाहीत. कारण, प्रदूषणाने परिसरातील जवळपास सर्व जमिनी ह्या बाधित झाल्या त्यामुळे शिकलेल्या मुलांना रोजगार मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांची दारे झिजवण्या पलीकडे काहीच हाती आले नाही .
या रासायनिक प्रकल्पाच्या उभारणीत साठ टक्के रासायनिक व चाळीस टक्के अन्य उद्योगांना प्राधान्य देण्याचे ठरले मात्र रासायनिक प्रकल्पामुळे अन्य उद्योगांनी या औद्योगिक क्षेत्राकडे पाठ फिरवली. परिणामी,
मोकळ्या जागादेखील रासायनिक उद्योगाला देण्यात आल्या. दरम्यान एकाच दिवशी एकाच वेळेस जवळपास पंधराशे एकर जागा शासनाला वर्ग करण्यात आली होती. ग्रामस्थांनी एकमुखाने सभा घेऊन ठराव मंजूर करून परिसरात आर्थिक क्रांती येणार या उद्देशाने आपल्या जमिनी आवर्जून दिल्या होत्या. परिणाम प्रत्यक्षात हे उद्योग आल्यावर झाला अन् ग्रामस्थांच्या या प्रयत्नांवर नांगरच फिरला.या रासायनिक प्रकल्पात मोठ मोठ्या उद्योगपतींचे उद्योग आजमितीस मोठ्या दिमाखदारपणे उभे आहेत. राजकीय पाठबळावर त्यांनी एका मागोमाग एक असे अनेक कंपन्या या प्रकल्पात उभ्या केल्या. प्रदूषणाचे कुठलेही नियम न
पळता सांडपाणी उघड्यावर सोडले.