पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत पतीने तिचा खून केला. मात्र गंभीररीत्या भाजलेल्या पत्नीने ससून रुग्णालयाच्या बर्न वॉर्डमध्ये उपचार घेताना पोलिसांना जबाब दिला. या मृत्यूपूर्व जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग न्यायालयात सादर करण्यात आल्यामुळे स्टोव्हच्या भडक्यामुळे पत्नी भाजल्याचा पतीचा बचाव खोटा ठरला. मृत्यूपूर्व जबाबाच्या आधारावर खून करणाऱ्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
तानाजी दत्ता उर्फ दत्तात्रय सरकाळे (वय २८, रा. तांदळी, शिरूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नी प्रियंका सरकाळे (वय २१) हिने तक्रार दिली होती. त्यानुसार, शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना ७ मे २०१६ रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान पीडितेच्या राहत्या घरी घडली. तानाजी आणि प्रियंका यांचा विवाह २०१३ मध्ये झाला. त्यांना एक मुलगा आहे. तानाजी कायम प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करायचा. प्रियंकाचे आई-वडील आणि काकाने तानाजीला नीट वागण्यासाठी समजावले. परंतु, त्यानंतरही तानाजीच्या वागण्यात काही बदल झाला नाही. घटनेच्या दिवशी तानाजीने प्रियंकाशी भांडण सुरू केले, तसेच मुलासमोरच तिला अर्वाच्च शिवीगाळ केली. त्यानंतर संतापून प्रियंकाच्या अंगावर रॉकेल ओतले. त्यामुळे घाबरून प्रियंका घराबाहेर पळाली. त्यावेळी तानाजीने तिला पेटवून दिले. त्यामुळे प्रियंकाने आरडाओरडा केल्यामुळे तानाजीने तिच्या अंगावर पाणी ओतून पसार झाला. पतीने जाळल्याने नव्वद टक्के होरपळलेल्या प्रियंकाच्या काकाने तिला तत्काळ ससून रुग्णालयात नेले. त्यावेळी पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे आणि हवालदार परशुराम म्हस्के यांनी तिची तक्रार व जबाब नोंदवून घेतला. पाच दिवस मृत्यूशी लढा दिल्यावर ११ मे २०१६ रोजी प्रियंकाची प्राणज्योत मालवली. तपास अधिकारी उत्तम भजनावळे यांनी तानाजीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवली, तसेच पत्नीचा मृत्यूपूर्व जबाब न्यायालयात सादर केला. हा जबाब नोंदविणाऱ्या पोलिसांची साक्ष जबाबाला पूरक ठरली, तसेच न्यायालयात जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सादर केले असता, पत्नीने सजगपणे जबाब नोंदविल्याचे निदर्शनास आले. मृत्यूपूर्व जबाब सुसंगत-विश्वासार्ह असल्याचे आणि पढविलेला नसल्याचे आढळल्यास आरोपीला दोषी ठरविण्याचा आधार ठरू शकतो, या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा दाखला सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी दिला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.