पुणे : ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना सुधकार प्रभू (वय ८५) यांचे पुण्यात शनिवारी (दि.१) निधन झाले. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. प्रवास वर्णनकार म्हणून त्यांची पुस्तके प्रसिध्द होती.
डॉ. मीना प्रभू यांचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण स. प. महाविद्यालयात झाले. बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएस केले होते. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या डीजीओ झाल्या. १९६६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या. तिथे सुमारे वीस वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले. प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये प्रवास केला असून, त्याची प्रवासवर्णने लिहिली. त्यावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे प्रवासवर्णनांवरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके यामध्ये प्रकाशित झाले होते. प्रवास वर्णनकार म्हणून त्या प्रसिध्द होत्या. त्यांचे पहिले प्रवासवर्णनपर पुस्तक ‘माझं लंडन’ हे होते. मीना प्रभूंनी डझनभरहून अधिक प्रवासवर्णने लिहिली. त्यामध्ये त्यांनी जगातील निरनिराळ्या ठिकाणांची ज्ञान देणारी व रंजन अशी माहिती दिली. त्यांची ‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन,’ ‘तुर्कनामा,’ ‘ग्रीकांजली,’ ‘चिनी माती’ अशी अनेक पुस्तके लोकप्रिय झाली.मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. तसेच मीना प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात २०१७ मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.