गुढे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 02:09 IST2016-02-08T02:09:27+5:302016-02-08T02:09:27+5:30

येथे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रभाग समितीच्या सभेत हिर्डोशी खोऱ्यातील हातभट्टीसह, सर्व प्रकारची दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला.

The verdict resolution in the Gudhs Gram Sabha | गुढे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

गुढे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

भोर : गुढे (ता.भोर) येथे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रभाग समितीच्या सभेत हिर्डोशी खोऱ्यातील हातभट्टीसह, सर्व प्रकारची दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला. त्वरित कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्वानुमते मंजुरीही देण्यात आली. ठरावाच्या प्रती पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) यांना पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी पाणी, वीज, शाळांसह विविध विषयांवर चर्चा झाली.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ यांनी गुढे येथे जिल्हा परिषदेच्या प्रभाग समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, सुरेश राजिवडे, विठ्ठल दिघे, राजाराम दिघे, संतोष ढवळे, पांडुरंग गोरे, लक्ष्मण दिघे, विस्तार अधिकारी पी.डी साळुंके, अनेक गावचे सरपंच व ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.
नीरा देवघर धरण भागातील रिंग रोडवरील पऱ्हर बु. व पऱ्हर खु., म्हसर खोऱ्यातील म्हसर बु. धनगरवस्ती येथे हातभट्टी तयार करून, निगुडघर व परिसरात विकली जाते. यामुळे अनेक गावांत दारू पिण्यात वाढ झाली आहे. भांडण-तंटे, वादविवाद वारंवार होत आहेत. त्यामुळे सर्व गावांतील हाभट्टीची दारू व निगुडघर येथील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी विविध गावच्या सरपंच यांनी प्रभाग समितीत केली. त्यावर समितीच्या अध्यक्षा वंदना धुमाळ यांनी तसा ठराव मंजूर करून, ठरावाच्या प्रती पोलीस निरीक्षकांना व पुणे ग्रामीणच्या अधीक्षकांना देण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
शिक्षक राहात नाहीत, वेळेवर शाळेत येत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन वंदना धुमाळ यांनी दिले. अंगणवाडी व शाळादुरुस्तीसाठी प्रत्येक शाळेला व अंगणवाडीला ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून, सर्वांनी आपापल्या गावच्या दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे आवाहन वंदना धुमाळ यांनी केले.

Web Title: The verdict resolution in the Gudhs Gram Sabha