वेध विलिनीकरणाचे : खडकवासला भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST2021-03-17T04:12:21+5:302021-03-17T04:12:21+5:30

विलीनीकरणामुळे पायाभूत सुविधांची अपेक्षा दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : धरण आणि लगतच सिंहगड किल्ला अशी पर्यटन स्थळे ...

Vedha Merger: Khadakwasla Part 1 | वेध विलिनीकरणाचे : खडकवासला भाग १

वेध विलिनीकरणाचे : खडकवासला भाग १

विलीनीकरणामुळे पायाभूत सुविधांची अपेक्षा

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : धरण आणि लगतच सिंहगड किल्ला अशी पर्यटन स्थळे खडकवासला परिसरात असूनही गावाकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

२५ हजार लोकसंख्या आणि ७० लाखांचा वार्षिक महसूल असणाऱ्या गावात अजूनही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. एकेकाळी गावाला ५ हजार एकराचे शेतीक्षेत्र होते. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जागा गेल्याने आता तुटपुंजी जमीन उरली आहे. त्यातच सर्वत्र अतिक्रमण झाल्याने गावपण हरवून बकाल स्वरूप येत चालल्याने गावकरी हवालदिल झाले आहेत.

खडकवासला धरण परिसर आणि सिंहगड किल्ला पाहण्यासाठी आठवडाभर आणि विशेषतः शनिवार, रविवारी पर्यटक गर्दी करतात. या दोन्ही पर्यटनस्थळांना जाण्यासाठी गावातूनच रस्ता जातो. मुख्य रस्त्याचे रुंदीकरण झाले नसल्याने वाहतूक कोंडी होते. याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागतो. वाहतूक गावाबाहेरून वळवण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू असून त्याची गती संथ असल्याने तो कधी पूर्ण होईल याची शाश्वती नागरिकांना नाही.

गावचे ग्रामपंचायत कार्यालय एका खोलीत आहे. त्या खोलीची अवस्था दयनीय आहे. ग्रामपंचायती समोरच्या रस्त्यावरच भाजीमंडई भरते. त्यात ग्रामपंचायत कुठे आहे हे शोधावे लागत असून महापालिकेने भाजीमंडईसाठी जागा आणि सोयीसुविधा द्याव्यात, अशी मागणी भाजी विक्रेत्यांनी ʻलोकमतʼकडे केली.

कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची यंत्रणा असूनही गावात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा असूनही गावातील अंतर्गत राजकारणामुळे तो पूर्ण झालेला नाही. कचरा प्रश्नावर गावातील तरुण संतप्त आहेत.

*कोट*

मुख्य रस्त्याच्या पर्यायी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. गावातून पानशेतपर्यंत रस्ता व्हायला हवा. विलीनीकरणाची प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण झाली पाहिजे. आमची बरीच जमीन यापूर्वीच संपादीत झाली असल्याने आता आरक्षण टाकू नये.

-सौरभ मते, सरपंच

........................

गावाचा काही प्रमाणात मुलभूत विकास झाला आहे. सध्या उत्पन्नाचे स्त्रोत घटले असल्याने विलीनीकरणानंतर कर वाढवला जाऊ नये.

-सतीश रणधीर, नागरिक

फोटो ओळ

खडकवासल्यातील मुख्य रस्त्याच्या पर्यायी मार्गावरील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे आहे. रस्ता खुला न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

Web Title: Vedha Merger: Khadakwasla Part 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.