वासंती काकडे अध्यक्षपदी
By Admin | Updated: August 18, 2015 03:57 IST2015-08-18T03:57:25+5:302015-08-18T03:57:25+5:30
शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या वासंती काकडे यांची बहुमताने सोमवारी निवड झाली. तर भाजपाच्या मंजूश्री खर्डेकर यांचा पराभव झाला

वासंती काकडे अध्यक्षपदी
पुणे : शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या वासंती काकडे यांची बहुमताने सोमवारी निवड झाली. तर भाजपाच्या मंजूश्री खर्डेकर यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या सदस्याने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा न देता तटस्थ भूमिका घेतली, तर मनसेच्या दोन सदस्यांनी अनुपस्थित राहून निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
शिक्षक बदली प्रकरणीनंतर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून वासंती काकडे आणि लक्ष्मीकांत खाबिया यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, शहराध्यक्ष व खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या समर्थक असल्याने काकडे यांना संधी मिळणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही काकडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी निवडणूक झाली. त्या वेळी काकडे यांना राष्ट्रवादी, काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांची मिळून ९ मते मिळाली. तर भाजपाच्या उमेदवार मंजूश्री खर्डेकर यांना शिवसेना तटस्थ राहिल्याने केवळ ३ मते मिळाली. त्यामुळे काकडे यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृहनेते बंडू केमसे, काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुभाष जगताप आदी उपस्थित होते.