पुणे : माजी नगरसेवक वसंत मोरे यांची शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने महापालिका निवडणूक समन्वयक म्हणून निवड केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना ही जबाबदारी दिली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षाला व्यापक जनाधार मिळवून देण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे.
शिवसेनेत प्रथमच अशा पद्धतीचे पद तयार करण्यात आले आहे. शहरप्रमुख म्हणून संजय मोरे व गजानन थरकुडे यांची नियुक्ती कायम आहे. त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी असेल. मोरे यांच्याबरोबरच शिवसेनेने आणखीनही काही नेमणुका केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड, भोसरी प्रभारी शहरप्रमुख म्हणून संजोग वाघेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख म्हणून पुरंदर व दौंडची जबाबदारी उल्हास शेवाळे यांच्याकडे असेल. चिंचवड व मावळचे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक असतील. शहरप्रमुख परेश बडेकर, (लोणावळा), राजेंद्र मोरे (देहूगाव) संदीप बालगरे (देहूरोड) यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे.
वसंत मोरे हे मूळ शिवसेनेचेच होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर पुण्यात मनसेचे नगरसेवक, शहरप्रमुख अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. लोकसभा निवडणुकीत पक्षनेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे त्यांनी मनसेचा राजीनामा दिला. वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात पराभूत झाल्यावर त्यांनी शिवसेनेत (उद्धव ठाकरे) प्रवेश केला. आता त्यांच्याकडे महापालिका निवडणूक समन्वयक म्हणून स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे.
‘होय, मी नगरसेवक होणारच’ अशी मोहीम लवकरच सुरू करणार असून शिवसेनेचे वारेच आता शहरात निर्माण करू असे त्यांनी नियुक्तीनंतर सांगितले. दोन्ही शहरप्रमुखांना बरोबर घेत लवकरच शहरात शिवसेनेची बांधणी सुरू करू, असे ते म्हणाले.