किरणे शिंदे, पुणेवैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण: हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ असह्य झाल्याने राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. तर वैष्णवीचा सासरा म्हणजे राजेंद्र हगवणे आणि दीर फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला असून, याच प्रकरणात त्यांचा सख्खा भाऊ संजय हगवणे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली आहे. हे तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर सासरे राजेंद्र व दीर सुशील हगवणे हे दोघेही फरार आहेत.
वैष्णवीने १६ मे रोजी केली होती आत्महत्या
शशांकची पत्नी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी भुकूम येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी छळ, चारित्र्यावर संशय आणि सतत होणारी मारहाण यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तिच्या वडिलांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मित्र आणि नातेवाईकांचीही चौकशी
फरार असलेल्या दोघांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलीस विविध पथकांच्या माध्यमातून तपास करत आहेत. त्यांचा संपर्क कुणाशी झाला होता?, लपण्यास कुणाची मदत झाली असावी?, या अनुषंगाने माहिती मिळवण्यासाठी हगवणेचे नातेवाईक, ओळखीचे, राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळातील व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले जात आहे.
वाचा >>संपूर्ण कुटुंबाला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे; वैष्णवीच्या आईची मागणी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांचीही चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे. सुनील चांदेरे यांच्याकडेही चौकशी करताना विचारण्यात आले की, राजेंद्र किंवा सुशील हगवणे यांच्याशी त्यांचा प्रकरणानंतर काही संपर्क झाला होता का? त्यांनी चौकशीदरम्यान आपला जबाब नोंदवला असून, अधिक तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.