पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. दुपारी त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टाने दोघांना २८ मे पर्यंत ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली असून, आता या संपूर्ण प्रकरणात न्यायासाठी मोठा आवाज उठवला जात आहे.
राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं. सध्या या प्रकरणात चौकशी अधिक वेगाने सुरु झाली असून, सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. लवकरच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती समोर आली आहे.