लस तेव्हाच मिळते, जेव्हा तुमचे ‘माननीय’ प्रभावशाली असतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:34+5:302021-05-15T04:09:34+5:30

लक्ष्मण मोरे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील लसीकरण मोहिमेचा फज्जा उडालेला असून काही ठरावीक केंद्रांवरच प्रशासन कार्यक्षम असल्याचे ...

Vaccines are only available when your 'honorables' are effective | लस तेव्हाच मिळते, जेव्हा तुमचे ‘माननीय’ प्रभावशाली असतात

लस तेव्हाच मिळते, जेव्हा तुमचे ‘माननीय’ प्रभावशाली असतात

लक्ष्मण मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील लसीकरण मोहिमेचा फज्जा उडालेला असून काही ठरावीक केंद्रांवरच प्रशासन कार्यक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे. लसीकरण केंद्रांवर आजी-माजी आमदार, नगरसेवकांनी थेट ताबा मारल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. शहरातील एकूण १९४ लसीकरण केंद्रांपैकी दहा केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण करण्यात आले आहे. आजवर एकूण ९ लाख ३५ हजार ५८२ नागरिकांनी लस घेतली असून यातील १ लाख ८० हजार लसी या दहा केंद्रांवर देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या बोटचेपेपणामुळे आणि ‘माननीयां’च्या प्रभावामुळे लसींचे असमान वितरण चालू आहे.

सर्वाधिक लसीकरण झालेल्या दहा केंद्रांमध्ये पहिला क्रमांक सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रभागातील कमला नेहरू रुग्णालयाचा आहे. याठिकाणी ३५ हजार ९१३ नागरिकांचे लसीकरण झाले. दहाव्या क्रमांकावर बिबवेवाडीतील प्रेमचंद ओसवाल दवाखाना असून याठिकाणी १० हजार २७ नागरिकांचे लसीकरण झाले. या केंद्रासाठी स्थायी समिती सदस्य बाळासाहेब ओसवाल यांनी प्रयत्न केले होते.

शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या ज्या प्रमाणात वाढविण्यात आली त्या प्रमाणात लसी उपलब्ध झालेल्या नाहीत. केंद्र मंजूर होऊनही अनेक नगरसेवकांना त्यांच्या केंद्रांवर लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे अनेक नगरसेवक नाराज आहेत. यासोबतच काही ठरावीक नगरसेवकांनाच लस मिळत असल्याचीही ओरड आहे.

दरम्यान, प्रशासन खंबीर नसल्याने कोणाला किती लस द्यायच्या याचा निर्णय माननीयांच्या दबावात होताना दिसतो. शहरातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या ‘टॉप टेन’ केंद्रांमध्ये कोथरूड, येरवडा, शिवाजीनगर, धायरी, बिबवेवाडी, पद्मावती या भागांतील रुग्णालयांतील केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये नगरसेवकांनी सुरू केलेली शाळा किंवा अन्य ठिकाणची केंद्र नाहीत. रुग्णालयातील केंद्रांचाच समावेश आहे.

चौकट

लसीकरणातील ‘टॉप टेन’ केंद्रे

कालावधी - १६ जानेवारी ते ९ मे २०२१

क्रमांक। रुग्णालय। लसीकरण

१. कमला नेहरू, सोमवार पेठ। ३५,९१३

२. जयाबाई सुतार, कोथरूड । ३५,९१३

३. राजीव गांधी, येरवडा। १९,१११

४. दळवी रुग्णालय, शिवाजीनगर। १८,९३७

५. मुरलीधर लायगुडे रुग्णालय, धायरी। १७,६२१

६. ससून रुग्णालय। १४,८६६

७. मालती काची रुग्णालय। ११,७२०

८. आण्णासाहेब मगर रुग्णालय। ११,३८२

९. प्रेमचंद ओसवाल, बिबवेवाडी। १००२७

१०. शिवशंकर पोटे दवाखाना। १०८६४

एकूण। १,८०,२६३

--------

शासकीय केंद्र - ११९

खासगी - ७५

एकूण केंद्र - १९४

------

आजवर झालेले लसीकरण

प्रकार। पहिला डोस। दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी। ५८,९९१। ४५,६७७

फ्रंट लाईन वर्कर। ६७,५१९। २४,४१२

६० च्या पुढील वयोगट। २,७३,२९४। १,२३,४१७

४५ ते ५९ वयोगट। २,७६,६८०। ४७,०८४

१८ ते ४४ वयोगट। १८,५०८।-----------

Web Title: Vaccines are only available when your 'honorables' are effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.