लस पोहोचली; पण आदेशाची प्रतीक्षा
By Admin | Updated: October 27, 2015 01:21 IST2015-10-27T01:21:13+5:302015-10-27T01:21:13+5:30
पेंटावॅलंट या पाच आजारांवर एकत्रित काम करणारी लस राज्य शासनाकडून पुणे महापालिकेकडे पोहोचली असून, अद्याप ती वापरण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत

लस पोहोचली; पण आदेशाची प्रतीक्षा
पुणे : पेंटावॅलंट या पाच आजारांवर एकत्रित काम करणारी लस राज्य शासनाकडून पुणे महापालिकेकडे पोहोचली असून, अद्याप ती वापरण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बालकांना या लशीसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सोमवारी राज्य आरोग्य विभागाकडून ही लस महापालिकेकडे आली आहे. त्याविषयी पालिकेच्या सर्व दवाखान्यांतील डॉक्टरांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. ३१ आॅक्टोबर रोजी पालिका दवाखान्यातील नर्सनाही या लशीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र अद्याप लस वापरण्यास कधीपासून सुरुवात करायची याबाबत कोणतीही ठोस माहिती राज्याकडून आलेली नसल्याचे पालिका लसीकरण अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जन्म झाल्यानंतर बाळ एक वर्षांचे होईपर्यंत होणारे विविध आजार व रोगांना प्रतिबंध करण्यासाठी बालकास दीड महिना, अडीच महिना व साडेतीन महिने असे तीन वेळा डोस देण्यासाठी नऊ वेळा इंजेक्शनची सुई टोचावी लागत होती. आता मात्र पाच रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी पेंटावॅलंट ही एकच लस देण्यात येणार आहे.
पूर्वी धनुर्वात, घटसर्प व डांग्या खोकला यासाठी त्रिगुणी ही एकमेव लस देण्यात येत होती. तसेच हेपॅटायटीस बी ची वेगळी लस द्यावी लागत होती. या लशीत पूर्वीच्या चार ऐवजी पाच रोगप्रतिबंधकांचा समावेश असणार आहे. त्यात आता हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी या आजाराच्या प्रतिबंधक लशीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. राज्य आरोग्य विभागाने याची प्रभावी जनजागृती करण्याचे आवाहन सर्व आरोग्य संस्था, रुग्णालय व स्थानिक स्वराज्य संस्थांना केले आहे. बालमृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती व मातांना याविषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प, हेपॅटायटीस बी आणि मेंदूज्वर (हिब) या आजारांपासून संरक्षण करणारी पेंटावॅलंट लस उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. मात्र प्रत्यक्ष वापर कधी होणार याबाबत साशंकता आहे.
खासगी दवाखान्यांमध्ये ही लस मागील अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. मात्र राज्य शासनाने अशाप्रकारे आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना ही लस उपलब्ध करून दिल्याने लहानग्यांमधील आजारांचे आणि पर्यायाने मृत्यूचे प्रमाण कमी होईल अशी आशा आहे.
- डॉ. शिशिर मोडक,
बालरोगतज्ज्ञ