उजनीतील मत्स्यबीजाची शिकार

By Admin | Updated: May 5, 2016 04:19 IST2016-05-05T04:19:29+5:302016-05-05T04:19:29+5:30

परप्रांतीय मासेमारांना हाताशी धरून स्थानिक धनदांडगे उजनीतील मत्स्यबीजाची मोठ्याप्रमाणात शिकार करीत आहेत. परिणामी, माशांची संख्या घटत आहे. सध्या धरणाची पातळी वजा आहे

Ushani Fishery Hunting | उजनीतील मत्स्यबीजाची शिकार

उजनीतील मत्स्यबीजाची शिकार

बारामती : परप्रांतीय मासेमारांना हाताशी धरून स्थानिक धनदांडगे उजनीतील मत्स्यबीजाची मोठ्याप्रमाणात शिकार करीत आहेत. परिणामी, माशांची संख्या घटत आहे. सध्या धरणाची पातळी वजा आहे. धरणाच्या अगदी पोटात झोपड्या टाकून परप्रांतीय मच्छीमार दिवसरात्र मत्स्यबीजाची शिकार करीत आहेत. यावर उजनी जलसंपदा विभाग व मत्स्यबीज विभाग मूग गिळून गप्प असल्याने स्थानिक मच्छीमार आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
उजनी जलाशयात २००२ सालापासून मत्स्यबीज सोडले गेले नाही. मागील १४ वर्षांपासून मत्स्यबीजच न सोडल्याने जलाशयात फक्त चिलापी जातीचाच मासा मोठ्याप्रमाणावर आहे. तत्कालीन आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर मत्स्यबीज विभाग काँग्रेस पक्षाकडे होते. उजनी जलाशयातील मासेमारीच्या ठेक्यावरून स्थानिक कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची तेव्हा आपापसांत जुंपली होती. या वादावर तोडगा न निघाल्याने १५ वर्षांपासून उजनीत मत्स्यबीजच सोडले गेले नाही. परिणामी, पैदास जास्त असलेला चिलापी जातीचाच मासा उजनीमध्ये तग धरून आहे. दुसऱ्या जातीच्या माशांचे बीज सोडले नसल्याने ते एक तर दुर्मिळ झाले आहेत किंवा नामशेष झाले आहेत. परप्रांतीय मच्छीमार वडाप प्रकारच्या जाळ्याचा मासेमारीसाठी वापर करतात. या प्रकारच्या जाळ्यामध्ये माशांसह इतर मत्स्यबीजाचीही मोठ्याप्रमाणात शिकार केली जाते.

१५ वर्षांपासून मत्स्यबीज नाही सोडले
चिलापी मासा घाण पाण्यामध्येही वाढतो. पूर्वी सापडणारे रव, कतला, मिरगळ, सफरनेस, खदराट, घोगरा, आहेर, कोळीस, वाम, मरळ आदी प्रकारचे मासे आता उजनीत सापडत नाहीत. मागील १५ वर्षांपासून मत्स्यबीज न सोडल्याचा हा परिणाम आहे.

मोजक्याच मच्छीमारांना परवानगी दिली
उच्च न्यायालयानेही स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. त्याप्रमाणे महिन्याला ५०० रुपये कराने जलसंपदा विभागाने स्थानिक मच्छीमारांना मासेमारीसाठी परवानगी दिली होती. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही काही मोजक्याच सुशिक्षित स्थानिक मच्छीमारांना ५०० रुपये घेऊन परवाने दिले. तर, बराचशा स्थानिक अशिक्षित मच्छीमारांचे ५०० रु. घेऊन अद्याप त्यांना परवाने दिले गेले नाहीत. ही संख्या मोठी आहे.

स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश आहे. मात्र, काही स्थानिक गावगुंडांनी परप्रांतीय मच्छीमारांना हाताशी धरून उजनीतील मत्स्यबीजाची शिकार चालवली आहे. मासे पकडण्याच्या जाळ््याऐवजी परप्रांतीयांनी चक्क मच्छरदानीचाच वापर सुरू केला आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात मत्स्यबीजाची शिकार होत आहे. हे सर्व मत्स्यबीज सुकवून हावडा येथील बाजारपेठेत पाठवतात. त्यातूून मोठ्याप्रमाणात माया कमवली जात आहे. या सर्व प्रकारावर उच्च न्यायालयात
२ वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती.
- चंदू भोई, अध्यक्ष,
उजनी मच्छीमार बचाव अभियान

Web Title: Ushani Fishery Hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.