सेंद्रिय खतासाठी मेंढ्यांचा वापर
By Admin | Updated: June 2, 2014 01:45 IST2014-06-02T01:45:27+5:302014-06-02T01:45:27+5:30
वेगवान नागरीकरणामुळे शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेती नाहीशी होऊन येथे मोठमोठ्या इमारती उभ्या रहात आहेत.

सेंद्रिय खतासाठी मेंढ्यांचा वापर
रहाटणी : वेगवान नागरीकरणामुळे शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेती नाहीशी होऊन येथे मोठमोठ्या इमारती उभ्या रहात आहेत. मात्र काही शेतकरी आपल्या जमिनी राखून आहेत. ते आजही हंगामाप्रमाणे पिके घेत आहेत. शेतकरी जमिनीला सुपीक करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरत आहेत. त्यातच जमिनीची पोत वाढविण्यासाठी शेतात शेळ्या-मेंढ्या बसविल्या जातात. ही परंपरागत पद्धत कायम असल्याचे रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात दिसते. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपिकतेवर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत जाते. दुसरीकडे महागडी व रासायनिक खते खरेदी करणे शेतकर्यांना कठीण झाले आहे. महागाईने शेतकर्यांचे कंबरडेच मोडल्याची वेळ आली आहे. आर्थिक ओढाताणीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. महागडी रासायनिक खते वापरणे परवडत नसल्याने अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला आहे. मात्र, त्यासाठी शेणखत वापरणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे चांगले पीक येत असल्याचे अनेक शेतकर्यांनी सांगितले. त्यामुळे शेतात शेळ्या-मेंढ्या बसविल्या जातात. यासाठी फिरतीवरील मेंढपाळांशी अगोदर संपर्कात रहावे लागते. शेतीची मशागत, पेरणी, कोळपणी हे योग्य वेळीच करावी लागते. आधुनिक यंत्राचा वापर करून का होईना पण शेती करणे अनेकांनी सोडले नाही.सध्या रहाटणी येथील तापकीरमळा परिसरात मेंढपाळांचे वाडे दाखल झाले आहेत. शेतात ठिकठिकाणी शेळ्या-मेंढ्या बसवले जात आहेत. एकीकडे शहराचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असताना दुसरीकडे शेतकरी जुन्या परंपरा सुरू ठेवत असल्याचे पाहून ग्रामीण भागात आल्याचा भास होतो. सिमेंटच्या जंगलात सुपीक शेती करण्याचे धाडस अनेक शेतकरी करीत आहेत. अगदी काही दिवसांवर मृगनक्षत्र येऊन ठेपला आहे. मोसमी पावसाला केव्हाही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे शहरातीलही शेतकरी जमिनीच्या मशागतीसाठी कामात मग्न दिसून येत आहे. (वार्ताहर)