श्रीपाल सबनीसांकडून दबावतंत्राचा वापर?
By Admin | Updated: September 30, 2015 01:34 IST2015-09-30T01:34:07+5:302015-09-30T01:34:07+5:30
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले प्रा. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य महामंडळाच्या

श्रीपाल सबनीसांकडून दबावतंत्राचा वापर?
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले प्रा. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांचे प्रचारपत्रकावर फोटो आणि मजकूर प्रसिद्ध करून मतदारांवर दबाव टाकत आहेत. प्रा. सबनीस यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी अनिल कुलकर्णी यांनी निर्वाचन अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तक्रार अर्जाची दखल घेऊन निर्वाचन अधिकाऱ्यांनी प्रा. सबनीस आणि डॉ. वैद्य यांना तातडीने खुलासा करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. यासंदर्भात निर्वाचन अधिकारी उद्या (दि. ३०) निर्णय देणार आहेत.
डॉ. वैद्य या जाणकार व अनुभवी आहेत. त्यांना निवडणुकीचे संकेत व रीतीरिवाज माहिती आहेत. त्या महामंडळाच्या अध्यक्षा असल्यामुळे कोणत्याही उमेदवाराचा जाहीर प्रचार करता येणार नाही, याची कल्पना त्यांना आहे. तथापि प्रा. सबनीस यांनी डॉ. वैद्य यांचा फोटो व काही मजकूर परस्पर व कोणाच्याही परवानगीशिवाय छापला असावा, असे कुलकर्णी यांच्या निवेदनात म्हटले आहे.
असा प्रचार महामंडळाच्या नियमाला अनुसरून नाही. ही चूक प्रा. सबनीस पुन्हा पुन्हा करीत आहेत. त्यामुळे मतदारांवर प्रा. सबनीस एक प्रकारचा दबाव टाकत आहेत व संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यांनी परवानगी घेतली नसेल तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती तातडीने कारवाई करून त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.
यासंदर्भात निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘कुलकर्णी यांचा तक्रार अर्ज मिळाला आहे. त्यानुसार प्रा. सबनीस आणि डॉ. वैद्य यांना नोटीस बजावण्यात आली आली असून मत मागविण्यात आले आहे. या तक्रार अर्जावर उद्या (दि. ३०) निर्णय घेण्यात येणार आहे.’’
(प्रतिनिधी)