उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण मराठीत; ८२ वर्षीय निवृत्त अभियंत्याने साकारला महत्त्वाकांक्षी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 15:28 IST2018-01-02T15:21:52+5:302018-01-02T15:28:44+5:30
शि. शा. कुलकर्णी यांनी गेल्या दहा वर्षांपासूनच्या ज्ञानसाधनेतून त्यांनी उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण तसेच गीता, ज्ञानेश्वरीतील सद्गुरू स्तवन, अष्टावक्रसंहिता आणि पतंजलींच्या योगसूत्राचा अनुवाद त्यांनी मराठीमध्ये अत्यंत सोप्या शब्दांत केला आहे.

उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण मराठीत; ८२ वर्षीय निवृत्त अभियंत्याने साकारला महत्त्वाकांक्षी प्रकल्प
पुणे : सनातन म्हणजे जी पूर्वापार चालत आली आहे ती संस्कृती. त्यामध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नाही. अगदी हिंदू धर्माचाही नाही. मात्र याची फारशी माहिती नसल्याने रूढी, परंपरेच्या नावाखाली मूठभर लोकांमुळे वाट्टेल त्या गोष्टींचे समाजात स्तोम माजवले जात असून, धर्माधर्मात देश विभागला गेला आहे. गीता असो किंवा उपनिषदे सगळीकडे मानवधर्माचीच शिकवण देण्यात आली आहे. याकरिताच ज्ञानेश्वरी, गीता किंवा उपनिषदांमध्ये नक्की काय सांगितले आहे, हे पोहोचविण्याचा संकल्प ८२ वर्षांच्या शिवराम शामराव उर्फ शि. शा. कुलकर्णी यांनी केला असून, गेल्या दहा वर्षांपासूनच्या ज्ञानसाधनेतून त्यांनी उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण तसेच गीता, ज्ञानेश्वरीतील सद्गुरू स्तवन, अष्टावक्रसंहिता आणि पतंजलींच्या योगसूत्राचा अनुवाद त्यांनी मराठीमध्ये अत्यंत सोप्या शब्दांत केला आहे.
मूळचे सांगलीचे असलेले कुलकर्णी पाटबंधारे विभागामध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी धर्मअभ्यासाला वाहून घेतले. कुलकर्णी यांचे वय आता ८२ असून, गेल्या दहा वर्षांत केलेल्या कठोर अभ्यास आणि संशोधनातून त्यांनी धर्मवाङ्मयाचा सोप्या शब्दांत आणि चाल लावता येईल अशा वृत्तामध्ये अनुवाद केला आहे. या प्रकल्पाविषयी ‘लोकमत’ प्रतिनिधीने यांच्याशी संवाद साधला.
कुलकर्णी म्हणाले, लहानपणापासून मला गीतेचे अध्याय तोंडपाठ होते. मात्र अर्थस्पष्टता नव्हती. गीतेचा अर्थ कळावा, याची एक जिज्ञासा निर्माण झाली. नोकरी सुरू असताना अभ्यास सुरू होताच; पण निवृत्तीनंतर या अभ्यासाला वाहून घेतले. गीता हे उपनिषदांचे सार असल्यामुळे उपनिषदांमध्ये नेमके काय आहे, याबाबत कुतूहल वाढले. त्यातून पुढे उपनिषदांचा अभ्यास सुरू केला. उपनिषदांच्या रसग्रहणाचे तीन खंड प्रसिद्ध केले असून, ब्रह्मसूत्राचा अभ्यास सुरू आहे. उपनिषदांच्या रसग्रहण खंड एकमध्ये ईशावास्य, केन, कठ, प्रश्न, मुण्डक, माण्डुक्य, तैतरेय, ऐतरेय, श्वेताशतर या उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण आहे. खंड दोनमध्ये छान्दोग्योपनिषद आहेत. खंड तीनमध्ये बृहदारण्यकोपनिषदांचे रसग्रहण करण्यात आले आहे. पुस्तकाच्या डाव्या बाजूला उपनिषद आणि उजव्या बाजूच्या पानावर रसग्रहण असे स्वरूप आहे. गीता, ज्ञानेश्वरी, अष्टावक्रसंहिता आणि पतंजलींचे योगसूत्र यांचा अनुवाद करण्यात आला आहे. हे मराठीतील रसग्रहण शार्दुलविक्रिडित वृत्तामध्ये शब्दबद्ध करण्यात आले आहे.
‘‘धर्माचे ज्ञान रूढीतून पुढे जाते. त्यामध्ये अभ्यास नसतो. धर्माचा अभ्यास करून काही लिहायचे असेल तर प्रकाशक मिळत नाहीत. वाचक ही पुस्तके खरेदी करत नाहीत. माझा अभ्यास केवळ माझ्यापुरता राहू नये म्हणून मी स्वखर्चाने हे खंड प्रसिद्ध केले आहेत. ज्ञानाची नोंद झाल्याने अभ्यासकांना निश्चित उपयोग होईल. हे ज्ञान पहिल्यांदाच मराठीत आणल्याचा आनंद आहे’
- शि. शा. कुलकर्णी