महिलांचा असुरक्षित प्रवास
By Admin | Updated: January 28, 2017 00:18 IST2017-01-28T00:18:58+5:302017-01-28T00:18:58+5:30
लोकलमध्ये महिलांसाठी राखीव डब्यात सध्या मद्यपी पुरुषांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महिलांचा असुरक्षित प्रवास
पिंपरी : लोकलमध्ये महिलांसाठी राखीव डब्यात सध्या मद्यपी पुरुषांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डब्यात महिला पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
पिंपरी रेल्वे स्थानकातून महाविद्यालयीन तरुणी आणि व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. पुणे ते लोणावळा लोकलचा मार्ग खडकी , दापोडी , कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी असा आहे. लोकलमध्ये महिलांच्या राखीव डब्याची संख्या तीन असते. लोकल रेल्वे स्थानकावर येताच महिला, तरुणी, लहान मुली लोकलमध्ये चढतात. याच वेळी मद्यपान केलेले तरुणही चढतात. चालत्या लोकलमध्ये या मद्यपींकडून गैरवर्तन केले जाते. त्यांना अटकाव केल्यास मद्यपींकडून दमबाजी केली जाते. याबाबत तक्रार केल्यास दुर्लक्ष केले जाते. डब्यात असणाऱ्या हेल्पलाइनवर फोन लावल्यास बराच वेळ फोन लागत नाही. ठराविक अंतर गेल्यानंतर मद्यपी गाडीतून उतरतात. डब्यातून उतरतानाही महिलांना धक्काबुक्की करणे , असे प्रकार घडत आहेत.
रेल्वे डब्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, तसेच संबंधित पोलिसांचे नंबर प्रवाशांना माहितीसाठी द्यावेत, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.(प्रतिनिधी)