चाकण - खेड तालुक्यातील खराबवाडी गावाच्या हद्दीत सारा सिटीमागील एमआयडीसी रस्त्यावर फोक्सवॅगन कंपनीच्या प्लॉटसमोर एका ३५ ते ४० वयाच्या अनोळखी पुरुषाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (19 डिसेंबर) सकाळी 6 वाजण्याच्या पूर्वी घडल्याची माहिती समोर आली आहे. खराबवाडीचे नवनिर्वाचित पोलीस पाटील किरण किर्ते यांनी याबाबत चाकण पोलिसांना माहिती दिली.
पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व त्यांचे पोलीस पथकाने घटना स्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. मृतदेह शव विच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले आहे. परिसरातून कुणी बेपत्ता असल्यास त्वरित चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी केले आहे. सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार एम एम शेख, सुभाष पवार, सूर्यकांत सातकर, संजय घाडगे, शेखर कुलकर्णी आदी पोलीस पथकाने घटना स्थळाच्या आजूबाजूचा परिसर पिंजून काढला आहे.