विद्यापीठ घेणार पाच पुरग्रस्त गावे दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 07:00 AM2019-08-14T07:00:00+5:302019-08-14T07:00:02+5:30

शासनाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातर्फे पाच गावे दत्तक घेवून या गावांची पुन्हा उभारणी केली जाणार आहे.

The university will adopt five flooded villages | विद्यापीठ घेणार पाच पुरग्रस्त गावे दत्तक

विद्यापीठ घेणार पाच पुरग्रस्त गावे दत्तक

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या मदतीने गावांमध्ये राबविणार स्वच्छता मोहीम

पुणे : अतिवृष्टी व पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही गावे उद्ध्वस्त झाली असून पुरामुळे बहुतांश गावांमध्ये अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी व पुरग्रस्तांना मानसिक दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातर्फे पाच गावे दत्तक घेवून या गावांची पुन्हा उभारणी केली जाणार आहे. तसेच या उपक्रमात शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे.
कोल्हापूर व सांगलीतील नदीकाठच्या गावांसह शहरातीलकाही भागांला सुध्दा पुराचा मोठा फटका बसला. सुमारे आठवडा भरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले. परंतु, योग्यवेळी सुरक्षित स्थळावर पोहचू न शकल्यामुळे पुराच्या पाण्यात ४० हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. सध्या पुरपरिस्थिती निवळत असली तरी काही भागात अजूनही पाणी साचलेले आहे. राज्यातील सर्वच भागातून  पुरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी, बिस्किट, भाकरी, कपडे, अशा जीवनोपयोगी वस्तूंच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, लोकांना मानसिक आधार देण्याची व गाव स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पाच गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे म्हणाले, पुरामुळे नुकसान झालेल्या गावांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. तसेच पुरामुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून परिसरात रोगराई पसरण्याची भिती आहे. सध्या पुरग्रस्तांना विविध भागातून वस्तू रुपात मदत येत आहे. परंतु, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार विद्यापीठाकडून पाच गावे दत्तक घेतली जातील. तसेच शासनाकडून राबविल्या जाणाºया पुनर्उभारणीच्या कामात विद्यापीठाचे विद्यार्थी सहभाग घेतील.

..............
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पाच गावे दत्तक घेण्यास मंजुरी दिली आहे. प्राध्यापक, प्राचार्य संघटना, संस्थाचालक, विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे सर्व सदस्य या सर्वांशी चर्चा करून विद्यापीठातर्फे पुरग्रस्त गावांच्या पुनर्उभारणीचे काम करण्यात येईल. तसेच लवकरच याबाबतची सविस्तर माहिती स्पष्ट केली जाईल.
- राजेश पांडे,व्यवस्थापन परिषद सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
 

Web Title: The university will adopt five flooded villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.