इंदापूर : ‘त्यांनी किती मर्सिडीज गाड्या दिल्या आहेत हे माहीत नाही, परंतु काहीतरी वक्तव्य करून एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही’, अशा शब्दांत नीलम गोऱ्हे विरुद्ध संजय राऊत प्रकरणासंदर्भात दोघांना ही फटकारणारी प्रतिक्रिया केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.सोलापूरहून मुंबईकडे जाताना सोमवारी (दि. २४) सायंकाळी आठवले हे काही काळ येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी रिपाइंचे पुणे जिल्हा प्रभारी विक्रम शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, तालुका युवकचे अध्यक्ष संदेश सोनवणे, शहराध्यक्ष अमोल मिसाळ, नितीन झेंडे, भाजपचे किरण गानबोटे, राष्ट्र सेवा दलाचे रमेश शिंदे, हनुमंत कांबळे, संदिपान कडवळे, अरविंद वाघ यांनी आठवले यांचे स्वागत केले.पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे समाजवादी कार्यकर्त्या म्हणून पुढे आल्या. त्यांनी काही वर्षे रिपाइंचे काम केले आहे. शिवसेनेतही काम केले. त्यांना तेथे चार वेळा आमदार केले. आत्ता त्या शिंदेसेनेत आहेत. विवाह सोहळ्याच्या निमित्त एकत्र आलेले उद्धव ठाकरे व राज ठाकरे कायमस्वरूपी एकत्र येतील, असे आपल्याला वाटत नाही.ते एकत्र आले तरी महाराष्ट्रात त्या दोघांची ताकद नगण्य आहे. राज ठाकरे यांच्या मोठ्या सभा होऊनही त्यांचा एक माणूस निवडून येत नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही. दोघे एकत्र आले तरी महायुतीवर परिणाम होणार नाही, असे आठवले म्हणाले.
'काहीतरी वक्तव्य करून ...' रामदास आठवलेंनी राऊतांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:42 IST