बिनविरोधचे नेत्यांचे प्रयत्न निष्फळ
By Admin | Updated: July 27, 2015 03:56 IST2015-07-27T03:56:23+5:302015-07-27T03:56:23+5:30
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या

बिनविरोधचे नेत्यांचे प्रयत्न निष्फळ
उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या ४ आॅगस्टला होणाऱ्या निवडणुकीसाठी मुदतीत सुमारे १०२ इच्छुकांनी एकूण ६ वॉर्डांतून उमेदवारी अर्ज भरले होते. यापैकी जवळपास ४३ उमेदवारांनी माघारीच्या अंतिम दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीसाठी मैदानात आता ५९ उमेदवार उरले आहेत.
या निवडणुकीसाठी गावातील ज्येष्ठ-बुजुर्ग पुढाऱ्यांनी एकत्र बैठका घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले; पण ते निष्फळ ठरले. प्रत्येकाने आपल्याच वारसांचा हक्क सांगितल्याने या बैठकीतून तरुण इच्छुक व त्यांच्या नेत्यांनी काढता पाय घेतला व चर्चा फिसकटली आणि प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने निवडणुकीत बहुरंगाची रंगत आली.
सोपान कांचन, राजाराम कांचन व महादेव कांचन यांचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ पॅनल, माजी सरपंच सुभाष महादेव कांचन यांचे श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनल, विद्यमान सरपंच दत्तात्रय कांचन यांचे तीन वॉर्डांतील ग्रामदैवत श्री काळभैवनाथ जोगेश्वरी विकास पॅनल, तर हवेलीचे ज्येष्ठ नेते प्रा. के. डी. कांचन व माजी सरपंच दत्तात्रय बा. कांचन यांची श्रीराम विकास आघाडी यांच्या व अन्य अपक्ष उमेदवारांमध्ये ही लढत सध्या तरी रंगतदार स्वरूप धारण करणारी ठरली आहे. विशेष म्हणजे सुभाष महादेव कांचन यांच्याशिवाय कोणाचेही पूर्ण क्षमतेच्या उमेदवारांचे पॅनल उभे राहू शकले नाही.
गावपुढाऱ्यांच्या नव्या पिढीने वॉर्ड क्र.१ मध्ये उभे राहून एकप्रकारे याच वॉर्डातील लढतीत बुजुर्गांच्या अस्तित्वाची कसोटी लावून दिली आहे. राजाराम कांचन यांचे दोन पुतणे या वॉर्डातून एकमेकांविरुद्ध आपले नशिब अजमावत आहेत. महादेव कांचन यांचे पुत्र अजिंक्य हे पण अपक्ष लढत देऊन आपल्या राजकारणातील निवडणुकीतूनच प्रवेश निश्चित करू पाहत आहेत, तर के. डी. कांचन, सागर पोपट कांचन या पुतण्याच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाची पडताळणी करीत आहेत व दत्तात्रय बा. कांचन हे पुत्र सुुनील दत्तात्रय कांचन यांच्या माध्यमातून नशिबाचा कौल घेत आहेत. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष देविदास कांचन हे पण आपला पुतण्या सागर योगीराज कांचन यांच्यामार्फत आपले या वॉर्डातील अस्तित्व आबाधित राखण्याच्या प्रयत्नात आहेत. एकंदरच वॉर्ड क्र.१ हा अत्यंत चुरशीचा व संवेदनशील असा झाला आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या वॉर्डातील निवडणुकीकडे लागून राहिले आहे.
सुभाष महादेव कांचन हे वॉर्ड क्र. ३ मधून आपले पुत्र सुनील सुभाष कांचन यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीतील आपले अस्तित्व राखतानाच संपूर्ण पॅनल उभे केल्यामुळे गावाचे कारभारी होण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. या वॉर्डातून हेमलता अभिजित कांचन (गडकरी) महिला उमेदवार अपक्ष उभ्या राहून तगडी लढत देत आहेत. एकूणच या निवडणुकीच्या वातावरणात उरुळी कांचन ढवळून निघाले आहे.