बेरोजगारांना मिळणार रोजगाराची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:52+5:302021-08-24T04:15:52+5:30
पुणे : कोरोना काळात औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोरोनाच्या भीतीने कामगारांवर पुणे ...

बेरोजगारांना मिळणार रोजगाराची संधी
पुणे : कोरोना काळात औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोरोनाच्या भीतीने कामगारांवर पुणे सोडण्याची वेळ आली. या बेरोजगारांच्या हाताला पुन्हा काम देण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून, कामगारांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ‘रोजगार मेळावा’ आयोजित केला आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिम्बायोसिस लॉ कॉलेज, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट आणि ललिता मोतीलाल सांकला फाउंडेशन यांच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सर्वच क्षेत्र बंद राहिल्याने कामगार वर्गाला सर्वात मोठी झळ बसली. या पार्श्वभूमीवर हा मेळावा भरविला जात आहे. औद्योगिक, बांधकाम, हाऊसकिपिंग आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी रोजगार दिला जाणार असल्याची माहिती प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय ए. देशमुख यांनी सोमवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत, सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या संचालिका डॉ. शशिकला गुरपूर, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा आणि ललिता मोतीलाल सांकला फाउंडेशनचे अध्यक्ष सनी सांकला या वेळी उपस्थित होते.
चौकट
रोजगारासाठी येथे करा अर्ज
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पहिला मजला, नवीन इमारत, जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, पुणे किंवा pratapswa@gmail.com