वरदहस्त व दुर्लक्षामुळे अनधिकृत होर्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:25 AM2018-10-06T02:25:27+5:302018-10-06T02:25:47+5:30

अनधिकृत होर्डिंग दुर्घटनेनंतर शहरात सर्रासपणे उभ्या असलेल्या अनधिकृत होर्डिंगचा विषय पुढे आला आहे. यामध्ये राजकीय वरदहस्त व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुणे शहरात

Unauthorized billings due to superstition and neglect | वरदहस्त व दुर्लक्षामुळे अनधिकृत होर्डिंग

वरदहस्त व दुर्लक्षामुळे अनधिकृत होर्डिंग

Next

पुणे : अनधिकृत होर्डिंग दुर्घटनेनंतर शहरात सर्रासपणे उभ्या असलेल्या अनधिकृत होर्डिंगचा विषय पुढे आला आहे. यामध्ये राजकीय वरदहस्त व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुणे शहरात आजही तब्बल ११४ अनधिकृत होर्डिंग उभे असल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व माहिती महापालिका प्रशासनाकडे असूनदेखील गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही कारवाईशिवाय ही होर्डिंग उभी आहेत. याचा राजकीय नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून वापर होत असल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे.

जुना बाजार चौकात शुक्रवार (दि. ६) दुपारी पावणेदोनच्या सुमारास अनधिकृत लोखंडी होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शहराच्या हद्दीत कोठेही होर्डिंग उभारण्यासाठी पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच किती आकाराचे, किती दिवसांसाठी, रस्त्यांपासून किती अंतरावर होर्डिंग उभारावे, यासाठी पालिकेने न्यायालयाच्या आदेशानंतर सन २००३ मध्ये जाहिरात नियमावली केली. त्यामुळे होर्डिंगला परवानगी देताना या सर्व गोष्टींचा विचार केला जाणे अपेक्षित असते. परंतु पालिकेकडून परवानगी घेताना व प्रत्यक्ष होर्डिंग उभारतानादेखील या नियमावलीला हरताळ फासला जातो, तर अनेक ठिकाणी बड्या राजकीय वरदहस्तामुळे पालिका अथवा अन्य कोणत्याही विभागाची परवानगी न घेता सर्रास अनधिकृत होर्डिंग उभे केले जात आहे.
महापालिकेच्यावतीने होर्डिंग वाटपात होणारा राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी ई-लिलाव पद्धत सुरू केली. ई-लिलावामुळे थेट राजकीय हस्तक्षेप कमी झाला असला तरी अनेक थकबाकीदारांना असलेला राजकीय वरदहस्त व अधिकाऱ्यांच्या लागेबांध्यामुळे वर्षानुवर्षे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न तर
बुडतच आहे. परंतु अनधिकृत होर्डिंगवर गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही स्वरुपाची कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली
आहे.

शहरात एकूण अधिकृत होर्डिंग : १ हजार ८६८
परवाना नूतनीकरण झालेल्या होर्डिंग : १ हजार ८६८
शहरातील अनधिकृत
होर्डिंग : ११४
होर्डिंगधारकांकडे असलेली थकबाकी : १३४ कोटी ३१ लाख ६६ हजार ८९२

फ्लेक्सवर झळकणारेही निषेध करायला पुढे
मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांचे वाढदिवस, निवडीचे भले मोठाले फ्लेक्स झळकले आहेत. मात्र शुक्रवारी दुपारी घटना घडल्यानंतर सर्व स्तरांतून निषेध, टीकेचा भडिमार सुरू झाला. ज्यांचे फ्लेक्स कायम येथे झळकले अशा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी निषेधाचा सूर आळवल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे अनधिकृत फ्लेक्स लावणारे आणि त्यावर झळकणाºया राजकीय पुढाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

दोषींची सीआयडीमार्फत चौकशी करा
४पुणे : होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी रेल्वे अधिकारी, कर्मचारी, होर्डिंगचे मालक व इतर दोषींची सीआयडीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच शासनामार्फत घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत करावी, तसेच या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व जे जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही डॉ. धेंडे यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून येथील होर्डिंग काढण्याचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे आजही होर्डिंग काढण्यात येत होते. यावेळी मी माझ्या मित्रांसह कट्ट्यावर गप्पा मारत होतो. जवळपास पावणेदोनच्या सुमारास होर्डिंग कोसळले. त्याखाली रिक्षा, दुचाकी आल्याचे पाहून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रिक्षातील एका महिला पॅसेंजरच्या पायाला दुखापत झाली होती. तसेच दुचाकीवरील तरुणाच्या डोक्यात होर्डिंग पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
- राकेश सवाखंडे, प्रत्यक्षदर्शी

ससूनही झाले सुन्न !
अपघातस्थळ ते ससून हॉस्पिटल १० मिनिटांचे अंतर. पण शुक्रवारी अपघातग्रस्तांसाठी मात्र हे अंतर परीक्षा बघणारे ठरले. अपघाताची बातमी समजताच या मार्गावरून ये-जा करणाºया आणि फोन लागत नसलेल्या अनेकांचे नातेवाईक रुग्णालयात आले होते. पोलिसांचा फोन गेल्यावर अपघातस्थळी पोहोचलेल्या अनेकांच्या आप्त स्वकीयांच्या हुंदक्यांनी ससून रुग्णालय व्यापून गेले होते. शवागाराजवळ थांबून शेवटच्या दर्शनासाठी कुटुंबीय अश्रू ढाळत होते.

घटनास्थळी पालकमंत्र्यांनी केली पाहणी
४दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात येईल. यासाठी खासदार अनिल शिरोळे यांच्या मार्फत पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या संदर्भात अनिल शिरोळे यांच्याशी नवी दिल्ली येथे बोलणे झाले असून अशी मदत केंद्रातर्फे देण्यात येईल, असे आश्वासन शिरोळे यांनी दिले आहे. दरम्यान पालकमंत्री या नात्याने मी आज दुर्घटनाग्रस्त स्थळाला भेट देऊन पाहणी केली.
४मागील काही दिवसांपासून होर्डिंग काढण्याचे काम सुरू होते. त्यादरम्यान ही घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यालयातील अधिकारी ही चौकशी करतील. होर्डिंग काढणाºया एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे दिसते. घटनेनंतर रेल्वेकडून तातडीने मदतकार्य सुरू केले. ससूनमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी चांगल्या रुग्णालयांमध्ये पाठविले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 

Web Title: Unauthorized billings due to superstition and neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.