दोन जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापतींची प्रतिष्ठा पणाला
By Admin | Updated: February 15, 2017 01:50 IST2017-02-15T01:50:37+5:302017-02-15T01:50:37+5:30
नसरापूर-भोलावडे गट २५ वर्षांपासून राष्ट्रवादीला मानणारा असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. दोन विद्यमान

दोन जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापतींची प्रतिष्ठा पणाला
भोर : नसरापूर-भोलावडे गट २५ वर्षांपासून राष्ट्रवादीला मानणारा असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. दोन विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांसह दोन माजी उपसभापतींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पूर्वीचा गट बदलून नवीन भाटघर धरणाच्या दोन्ही भागांतील गावे, महुडे खोरे व वेल्हे रोडवरील गावांचा मिळून नवीन नसरापूर-भोलावडे गट तयार करण्यात आला आहे. हा गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव तालुक्यातील सर्वांत मोठा गट असून दुर्गम, डोंगरी भागाचा त्यात समावेश आहे. या गटातून काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल आवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे उमेदवार कुणाल साळुंके यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही तासांत राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळविल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे उमेदवाराची शोधाशोध करावी लागली आणि ऐन वेळी राष्ट्रवादीचे सूर्यकांत माने यांना उमेदवारी द्यावी लागली. तर, जिल्हा परिषदेला इच्छुक असणारे लहू शेलार यांना पंचायत समिती लढावी लागत असून उमेदवारी न मिळाल्याने गणेश खुटवड नाराज झाले होते. मात्र, त्यांनी माघार घेतली आहे. भाजपाचे उमेदवार विश्वास ननावरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भाजपाकडे दुसरा उमेदवार नसल्याने तिरंगी लढत होईल. राष्ट्रवादीला अंर्तगत नाराजी दूर करून काम करावे लागेल. मात्र, २५ वर्षांपासून माजी आमदार कै. काशिनाथराव खुटवड यांना मानणारे मतदार या भागात आहेत. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.
सर्वसाधारण असलेल्या नसरापूर गटातून पूर्वी राष्ट्रवादीत असलेले संतोष सोंडकर यांना काँॅग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली आहे. तर, जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले हातवे बुद्रुकचे सरपंच लहू शेलार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. तर, याच भागातील संतोष भिलारे (शिवसेना), संतोष धावले (भाजपा) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भोलावडे गणातून विठ्ठल वरखडे यांची सून भारती वरखडे यांना काँग्रेसने , राष्ट्रवादीने माजी सरपंच कै. सोपान बोडके यांच्या पत्नी मंगल बोडके, तर शिवसेनेने द्रोपदा खुटवड यांना उमेदवारी दिली आहे.
मनीषा सणस यांनी माघार घेतली असून, विद्यमान पंचायत समिती सदस्या सुवर्णा मळेकर यांनी उमेदवारी दाखलच केली नाही. या भागावर राष्ट्रवाचे वर्चस्व आहे. मात्र, या वेळी राष्ट्रवादीकडून ऐन वेळी उमेदवारी दिल्याने नाराजी वाढली होती.
विद्यमान जिल्हा परिषद सदस्य वंदना धुमाळ व तृप्ती खुटवड यांच्याच मतदारसंघाचा भाग जोडून नवीन मतदारसंघ तयार करण्यात आल्याने या भागावर त्यांचेच वर्चस्व आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी तिरंगी लढत होत असून माजी उपसभापती विक्रम खुटवड आणि मानसिंग धुमाळ या दोघांच्या पत्नी विद्यमान जिल्हा परिषद सदस्या असून दोन्ही पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडून आणावे लागणार असल्याने दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर, काँग्रेसकडून हा गट आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आमदार संग्राम थोपटे प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेला मानणारी काही गावे याच गटात येत असल्याने जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडेही गट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे तिरंगी लढत होणार आहे (वार्ताहर)