पिंपरी : गवळीमाथा, बसवेश्वर चौकात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात नागेश पाटील (वय ३५, रा. काळेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सातच्या सुमारास पाटील हे दुचाकीवरून बसवेश्वर चौकातून काळेवाडीच्या दिशेने जात होते. त्या वेळी त्यांना अज्ञात मोटारीची जोरदार धडक बसली. ते खाली पडले. डोक्याला जबर मार लागला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला. एमआयडीसी- भोसरी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघातानंतर त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली. मात्र कोणीही कोणत्या मोटारीची धडक बसली याबद्दल सांगत नव्हते. बसवेश्वर चौकात वजन काट्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. त्यातील फुटेज तपासल्यास कोणत्या वाहनाची धडक बसली, याचा शोध घेता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:27 IST