भीमाशंकरमध्ये दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन
By Admin | Updated: August 18, 2015 03:48 IST2015-08-18T03:48:37+5:302015-08-18T03:48:37+5:30
‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या घोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे दोन लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले

भीमाशंकरमध्ये दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन
घोडेगाव : ‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या घोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे दोन लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.
शनिवार व रविवार या दोन दिवस सुट्या व लागून आलेला पहिला श्रावणी सोमवार, असे तीन दिवस भीमाशंकरमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. इतरत्र कोठेही पाऊस नसला, तरी भीमाशंकरमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या व सगळा परिसर धुक्याने वेढलेला होता. अशा वातावरणात भाविक दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घेत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ७० पोलीस कर्मचारी व १० अधिकारी तैनात करण्यात आले होते. शनिवारी व रविवारी असा दोन दिवस पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे घोडेगाव व राजगुरुनगरच्या मोजक्या पोलिसांवर ताण आला होता.
आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाचे स्वयंसेवक मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम करीत होते. आरोग्य विभागानेही फिरते आरोग्य पथक नेमले होते. देवस्थानाचे कार्यकारी विश्वस्त व खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे, आंबेगावचे तहसीलदार बी. जी. गोरे, उपकार्यकारी विश्वस्त सुरेश कौदरे, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोषकुमार गिरीगोसावी, घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर हे थांबून यात्रेचे नियोजन करीत होते. (वार्ताहर)