आरपीआयमध्ये दोन गट
By Admin | Updated: February 5, 2017 03:47 IST2017-02-05T03:47:10+5:302017-02-05T03:47:10+5:30
भारतीय जनता पक्षासोबत महापालिका निवडणुकीमध्ये युती करून उमेदवारी मिळवताना शहराध्यक्षांसह उमेदवारांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले)

आरपीआयमध्ये दोन गट
पुणे : भारतीय जनता पक्षासोबत महापालिका निवडणुकीमध्ये युती करून उमेदवारी मिळवताना शहराध्यक्षांसह उमेदवारांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) अस्तित्व संपुष्टात आणण्याचा डाव रचल्याचा आरोप पक्षातील नाराज गटाकडून करण्यात आला आहे.
महापालिका जागावाटपावरून आरपीआयमध्ये शहरात दोन गट पडले असून नाराज गट रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध सभा घेऊन निदर्शने करणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोपही शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये करण्यात आला.
या बैठकीला युवक शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, अशोक शिरोळे, तानाजी ताकपेरे, बाळासाहेब शेलार, बाबा लोखंडे, बाबासाहेब साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कमळ चिन्हावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत पक्षाध्यक्ष आठवलेंकडे दाद मागण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पक्षाला स्वतंत्र चिन्ह अद्याप मिळालेले नाही. नवे चिन्ह घेऊन मतदारांपर्यंत तो पोहोचवणे शक्य होत नाही. या अडचणीचा विचार करूनच कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षाचे निरीक्षक, शहर संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे घेतला आहे.
- बाळासाहेब जानराव,
ज्येष्ठ नेते, रिपाइं, आठवले गट