एकाच दिवशी दोन परीक्षा, पोलीस भरतीचा पेपर पुढे ढकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:32+5:302021-08-28T04:14:32+5:30
पुणे : चार वेळा रद्द झालेली संयुक्त पूर्वपरीक्षा व पोलीस भरती परीक्षा येत्या ४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी होणार ...

एकाच दिवशी दोन परीक्षा, पोलीस भरतीचा पेपर पुढे ढकला
पुणे : चार वेळा रद्द झालेली संयुक्त पूर्वपरीक्षा व पोलीस भरती परीक्षा येत्या ४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी होणार आहेत. विद्यार्थ्यांची त्यामुळे गैरसोय होणार आहे. गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांना फार कमी संधी मिळाली आहे. आता एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागेल म्हणून पोलीस भरतीचा पेपर दोन दिवस पुढे ढकला, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली आहे.
येत्या ४ सप्टेंबरला महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. तिची तारीख ४ सप्टेंबर असून याच दिवशी महाराष्ट्र पोलीस भरतीचा लेखी पेपर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. जर एकाच दिवशी दोन्ही पेपर आले तर काही विद्यार्थ्यांना एकच पेपर देता येईल, दुसरा पेपर देता येणार नाही.
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये एक ते दोन दिवस अंतर ठेवण्यात यावं, त्यामुळे मुलांवर अन्याय होणार नाही. ते दोन्ही परीक्षा वेळेवर देऊ शकतील. जर दोन दिवस पुढे ढकलल्या तर विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही. यावर तातडीने लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा आणि दोन दिवस हे कमीत कमी अंतर असावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विद्यार्थी महेश घरबुडे, शर्मिला येवले, गणेश ननवरे आदींनी निवेदन देऊन केली आहे.