Pune: दोन मुले अमेरिकेत, एक मुंबईत; ८९ वर्षीय वृद्धाची गॅलरीतून उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 10:19 AM2023-12-04T10:19:30+5:302023-12-04T10:20:05+5:30

वृद्धाने एकटेपणातून हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे....

Two children in America, one in Bombay; 89-year-old man jumps from gallery | Pune: दोन मुले अमेरिकेत, एक मुंबईत; ८९ वर्षीय वृद्धाची गॅलरीतून उडी

Pune: दोन मुले अमेरिकेत, एक मुंबईत; ८९ वर्षीय वृद्धाची गॅलरीतून उडी

पुणे :कोथरूड भागातील एका ८९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फ्लॅटच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी घडली. मकरंद महादेव मेंगाळे (वय ८९, रा. मयूर काॅलनी, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू, अशी नोंद केली आहे. वृद्धाने एकटेपणातून हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मयूर कॉलनीतील एका इमारतीत मकरंद मेंगाळे राहत होते. त्यांना तीन मुले आहेत. दोन मुले नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाली, तर एक मुलगा मुंबईत आहे. मकरंद एकटेच राहत होते. त्यांच्या देखभालीसाठी मुलांनी एक नोकर ठेवला होता. तो त्यांना दोन वेळा जेवण आणून द्यायचा. मकरंद यांची शुश्रूशा करायचा. मकरंद यांच्या मुलांनी फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. मकरंद यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा विकार होता. त्यांना चालताही येत नव्हते. ते वॉकर घेऊन चालायचे.

रविवारी दुपारी एकच्या सुमारास मकरंद यांना डबा आणण्यासाठी कामगार घरातून बाहेर पडला. मकरंद वाॅकर घेऊन गॅलरीत आले. गॅलरीतून ते उडी मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी इमारतीसमाेर थांबलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी त्यांना उडी मारू नका, असे सांगितले; पण मकरंद यांनी गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती कोथरूड पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्या मुलांशी संपर्क साधला असून, मुंबईतील वास्तव्यास असलेला मुलगा पुण्याकडे रवाना झाला असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Web Title: Two children in America, one in Bombay; 89-year-old man jumps from gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.