रिक्षाचालकाने परत केली अडीच लाख असलेली बॅग

By Admin | Updated: November 16, 2016 21:41 IST2016-11-16T21:41:09+5:302016-11-16T21:41:09+5:30

नोटा बंदीमुळे सर्वत्र गोंधळ उडालेला असतानाच गरीब कष्टक-यांमधून मात्र प्रामाणिकपणाचे वस्तुपाठ घालून देणारी उदाहरणे समोर येत आहेत.

A two-and-a-half-lakh bribe bag was returned by the autorickshaw driver | रिक्षाचालकाने परत केली अडीच लाख असलेली बॅग

रिक्षाचालकाने परत केली अडीच लाख असलेली बॅग

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि 16 : नोटा बंदीमुळे सर्वत्र गोंधळ उडालेला असतानाच गरीब कष्टक-यांमधून मात्र प्रामाणिकपणाचे वस्तुपाठ घालून देणारी उदाहरणे समोर येत आहेत. वारजे परिसरात रिक्षामध्ये विसरलेली तब्बल अडीच लाख रुपये असलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात जमा केली. विशेष म्हणजे त्याच वेळी ही रोकड हरवल्याची तक्रार घेऊन एक महिला पोलीस ठाण्यात पोचली होती. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
मारुती एकनाथ मोरे (वय ६२, रा. गोकुळनगर, वारजे) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे त्यांची रिक्षा घेऊन बंगळुरु मुंबई बाह्यवळण रस्त्यावर प्रवासी थांब्यावर उभे होते. अहमदाबाहून आलेल्या तुलशी दिलीप गुप्ता (वय ५४, रा. पद्मावती) बुधवारी दुपारी एकच्या सुमारास सिमला फाऊंडेशन येथे उतरल्या. त्या मोरे यांच्या रिक्षात बसल्या. त्यांना मोरेंनी वारजे चौकात सोडले. गुप्ता यांच्याकडून ममिटर प्रमाणे पैसे घेऊन मोरे पुढे निघून गेले. रिक्षा निघून गेल्यावर आपली अडीच लाख रुपये असलेली बॅग रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. गोंधळलेल्या अवस्थेतच त्यांनी वारजे पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांना रिक्षामध्ये पैशांची बॅग विसरल्याची माहिती देत असतानाच मोरे पोलीस ठाण्यात पोचले. त्यांनी पोलिसांना आपल्या रिक्षात पैशांची बॅग विसरली असून ती ताब्यात घ्या असे सांगितले. पाचशे रुपयांच्या पाचशे नोटा असलेली ही बॅग पोलिसांकडे सोपवण्यात आली. दरम्यान, गुप्ता यांना मोरे पैसे घेऊन आल्याचे समजले. त्यांनी मोरे यांचे आभार मानत बॅग उघडून पाहिली तेव्हा आतमधील नोटा जशाच्या तशा होत्या. त्यामध्ये किंचितही बदल नव्हता. गुप्ता यांनी मालमत्तेच्या व्यवहारामधून मिळालेली ही रक्कम असल्याचे पोलिसांना सांगितले. वरिष्ठ निरीक्षक अनुजा देशमाने यांनी मोरे यांच्या प्रमाणिकपणाचे कौतुक केले.
-------------------
व्यवहारातील मोठ्या चलनी नोटांवर बंदी येताच आपल्याकडील काळ्या धनाचे करायचे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कोणी नदी नाल्यात तर कोणी कच-यात या नोटा फेकून देत आहे. तर नोटा जाळतही आहे. मात्र, पुण्यामध्ये कष्टक-यांकडून प्रामाणिकपणाचे आदर्श घालून दिले जात आहेत. काही दिवसांपुर्वी कचरावेचक शांताबाई ओव्हाळ यांना कच-यात सापडलेल्या ५२ हजारांच्या नोटा त्यांनी पोलिसांकडे जमा केल्या होत्या. बुधवारी रिक्षाचालक मारुती मोरे यांनीही प्रामाणिकपणे अडीच लाख रुपये परत केले आहेत.

Web Title: A two-and-a-half-lakh bribe bag was returned by the autorickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.