try to doing murder because of quarrel on waste material disposal | कचरा टाकण्याच्या वादातून खुनाचा प्रयत्न 
कचरा टाकण्याच्या वादातून खुनाचा प्रयत्न 

पिंपरी चिंचवड (तळवडे) : कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात डोळ्यात मिरची पावडर टाकली. जबर मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. चिखलीतील घरकुल गृहप्रकल्पात सोमवारी (दि. १०) ही घटना घडली. चिखली पोलिस ठाण्यात पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट आरणे आणि रेखा आरणे (दोघे रा. मोरया हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रवीण नारायण दुसाणे (वय ४७, रा. मोरया हाउसिंग सोसायटी,  घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. 


आरोपी पोपट आरणे आणि रेखा आरणे पती-पत्नी आहेत. फिर्यादी प्रवीण दुसाणे आणि आरोपी आरणे यांचे घर समोरासमोर आहे. घरासमोर कचरा टाकण्यावरून फिर्यादी प्रवीण दुसाणे आणि रेखा आरणे यांच्यात भांडण झाले. त्याचा राग मनात धरून पोपट आरणे यांनी प्रवीण दुसाणे ज्या ठिकाणी रिक्षा लावतात त्या ठिकाणी रिक्षा उभी केली.  उभी केलेली रिक्षा बाजुला काढल्याचा राग आल्याने पोपट आरणे यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.  डोळ्यात मिरचीपूड टाकून लोखंडी गजाने डोक्यात, तोंडावर, हातावर आणि पाठीवर मारून गंभीर जखमी करुन फिर्यादी प्रवीण दुसाणे यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.


Web Title: try to doing murder because of quarrel on waste material disposal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.