प्रचाराचा विद्यार्थ्यांना होतोय त्रास
By Admin | Updated: February 11, 2017 02:21 IST2017-02-11T02:21:45+5:302017-02-11T02:21:45+5:30
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर धरला आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार सुरू करण्यात आला आहे.

प्रचाराचा विद्यार्थ्यांना होतोय त्रास
रावेत : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर धरला आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार सुरू करण्यात आला आहे. यामध्ये रिक्षांसह विविध वाहनांवरून लाऊड स्पीकरवरून उमेदवारांचा गल्ली-बोळात प्रचार सुरू आहे.
शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही ध्वनिक्षेपकावरून प्रचार करण्यात येत असून, ध्वनिमर्यादेचे उल्लंघनही होत आहे. अशाप्रकारच्या प्रचारामुळे शाळा-महाविद्यालयीन परिसरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
येत्या काही दिवसांवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्या आहेत आणि याच कालावधीत निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर बरेच विद्यार्थी निवडणूक प्रचारात सहभागी झालेले दिसून येत आहेत. एकंदरीत या निवडणुकीच्या वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता शैक्षणिक वर्तुळासह मनोविकारतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार सुरू आहे. जाहिरात फलकांबरोबरच दूरदर्शन, वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती, पथनाट्य व लाऊडस्पीकरवरून जाहिरातींचा यात समावेश आहे. प्रामुख्याने ज्या भागात शैक्षणिक संस्था आहेत. त्या परिसरातून लाऊडस्पीकरवरून करण्यात येणाऱ्या प्रचारामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळा निर्माण होत असल्याची शिक्षकांची तक्रार आहे.
याबाबत बिजलीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक चारुहास चिंचवडे यांनी सांगितले की, प्रचारात ध्वनीच्या मर्यादेचे उल्लंघन सर्रास होत आहे. तीन ते चार उमेदवारांच्या गाड्या एकत्र आल्यास गोंधळाची परिस्थिती
निर्माण होत आहे. शाळा-महाविद्यालयांजवळ एकापेक्षा अधिक प्रचाराच्या गाड्या आल्यास लाऊडस्पीकरवरील आवाजाच्या गोंगाटामुळे विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होत आहे.
शाळा-महाविद्यालयाच्या मार्गावर असणाऱ्या उमेदवारांच्या जाहिरातफलकांचेही विद्यार्थ्यांना आकर्षण वाटत आहे.
बोर्डाच्या तोंडी, प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा आहेत. त्यातच महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गल्ली-परिसरातील राजकीय वातावरणाचा शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत
नाही.
बारावी आणि दहावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. या परीक्षेचा विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. परंतु प्रचाराच्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. तसेच शिक्षकांना निवडणुकीचे प्रशिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशी पालकांची तक्रार आहे. (वार्ताहर)