सहल आली संमेलनात
By Admin | Updated: January 19, 2016 01:31 IST2016-01-19T01:31:35+5:302016-01-19T01:31:35+5:30
ना शिवनेरी, ना रायगड, ना अलिबाग; विद्यार्थ्यांची सहल थेट निघाली ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला. आश्चर्य वाटले ना! पण खरंय! विद्यार्थीदेखील

सहल आली संमेलनात
बेनझीर जमादार, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) :
ना शिवनेरी, ना रायगड, ना अलिबाग; विद्यार्थ्यांची सहल थेट निघाली ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला. आश्चर्य वाटले ना! पण खरंय! विद्यार्थीदेखील मोठ्या उत्साहात या सहलीचा आनंद लुटताना दिसत होते. शाळेत ज्या विषयांचे धडे आपण गिरवतो, त्या धडे लिहिणाऱ्या लेखकाला व कवीला प्रत्यक्ष भेटायला मिळणार, याबाबतचा उत्साह मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात स्वत: त्याच कवीच्या ओठी त्यांनी केलेली कविता ऐकणे हे विद्यार्थ्यांचे भाग्यच! असेच काहीसे हावभाव विद्यार्थ्यांसहित शिक्षकांच्या चेहऱ्यावरदेखील उमटताना दिसत होते.
शहरातील क्रीडा प्रबोधिनी विद्यालय, संत तुकाराम माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा (शिवे), लोणकर विद्यालय (मुंढवा) अशा अनेक शाळांनी या चार दिवसांत संमेलनाला भेट दिली. या शाळेतील पाचवी ते दहावी अशा प्रत्येक वर्गाने संमेलनाच्या सहलीचा फेरफटका मारला आहे. तसेच संमेलनाच्या आवारातदेखील शाळेचा गणवेश, हातात डबा व पाण्याच्या बाटलीची पिशवी, तसेच रांगेत चालणारे विद्यार्थी असे काही सहलीचेच चित्र निदर्शनास आले.
संशोधक रघुनाथ माशेलकर यांच्यावर आधारित धडा दहावीला असल्यामुळे त्यांना ऐकण्यासदेखील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद दिसला. माशेलकरांचा आॅटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची घाईदेखील नजरेस पडली.
या वेळी विद्यार्थी म्हणाले, ‘‘संमेलन ही भाषा थोरा-मोठ्यांच्या तोंडी व पुस्तकातच वाचायला मिळायची. पण आज हेच संमेलन आपल्या शहरात पहिल्यांदा भरल्यामुळे ते पाहण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. एखाद्या हिरोला पाहण्यासाठी जो उत्साह असतो, तोच पुस्तकातील लेखक, साहित्यिक व कवी यांना पाहण्यासाठी होता. शाळेच्या माध्यमातून संमेलनाला ही अनोखी सहल निघाली व साहित्यिकांना व पुस्तकांनादेखील भेटता आले. ’’
धार्मिक ग्रंथ, पुस्तकांनाही पसंती
पिंपरी : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी असले तरी, संमेलनात मराठीसह, इंग्रजी आणि इस्लामिक साहित्यही उपलब्ध होते. याचबरोबर धार्मिक विषयावरील असंख्य पुस्तकांनी लक्ष वेधून घेतले. या साहित्यालाही वाचकांची उत्स्फूर्त पसंती मिळाली. अशाप्रकारे पुस्तक दालनास सर्वधर्मसमभावाचे वैश्विक रूप प्राप्त झाले होते.
संमेलनातील दोन दालनांत शेकडो पुस्तक स्टॉल मांडण्यात आले होते. प्रकाशकांनी आपले दालने सजविली होती. यामध्ये कथा, कादंबऱ्या, गं्रथ, कवितासंग्रह, शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षा अशाप्रकाराची हजारो पुस्तके होती. प्रत्येक दालनात पुस्तक खरेदीसाठी झुंबड उडाली होती. बालगोपाळांपासून, तरुणाई, प्रौढ आणि वयोवृद्ध मंडळींनी आपआपल्या पसंतीची पुस्तके घेतली. शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांनीही आवडीची पुस्तके निवडली.
धार्मिक विषयावर वाहिलेली स्वतंत्र दालने लक्ष वेधून घेत होती. श्रीदत्त गुरूदेव, स्वामी समर्थ, भगवान बुद्ध, संत तुकडोजीमहाराज, वेगवेगळे धर्मगुरू, अशी अनेक दालनात धार्मिक छोटी- मोठी पुस्तके होती.
इस्लामिक साहित्याची दोन स्वतंत्र दालने आगळीवेगळी ठरली. वेगळे काही तरी वाचण्यास मिळेल म्हणून वाचक या दालनास हमखास भेट देत होता. इस्लाम धर्माची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत होती. धर्मग्रंथ कुराण मराठी भाषेत उपलब्ध होता. त्यास नागरिकांनी प्रतिसाद दिला.
आजच्या मोबाइल आणि संगणकाच्या युगात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्तदेखील नवीन पुस्तकांची ओळख व्हावी, तसेच संमेलन नक्की काय असते, याची जाणीव व्हावी; आरोग्य, आध्यात्मिक, आत्मचरित्र, वैचारिक अशा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके त्यांना पाहता यावीत, त्याचप्रमाणे नवीन लेखकांची नावे माहिती व्हावीत, यासाठी ही अनोखी सहल काढण्यात आली.
- कविता चौधरी (शिक्षिका, क्रीडा प्रबोधिनी विद्यालय)