शहराची कचराकोंडी फुटली

By Admin | Updated: March 3, 2015 01:11 IST2015-03-03T01:11:00+5:302015-03-03T01:11:00+5:30

उरूळी देवाची येथील कचरा डेपोत गेल्या दोन महिन्यांपासून कचरा टाकणे बंद असतानाही महापालिकेने ८० हजार टन कचऱ्याची यशस्वी विल्हेवाट लावली आहे.

The trash of the city bursts | शहराची कचराकोंडी फुटली

शहराची कचराकोंडी फुटली

पुणे : दोन महिन्यांपासून शहरात सुरू असलेलेली कचराकोंडी सोमवारी फुटली. शहरात निर्माण होणारा सुका कचरा तसेच प्रक्रिया प्रकल्पांमधून निघणारे इनर्ट वेस्ट (प्रक्रिया न होणारा कचरा) उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर टाकण्यास ग्रामस्थांनी परवानगी दिली असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिले. त्यानुसार, उद्या (मंगळवार)पासून डेपोत ५०० ते ६०० टन कचरा टाकण्यात येणार असल्याचे आदेश पालकमंत्र्यांनीच दिले असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.
उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी १ जानेवारीपासून बेमुदत आंदोलन पुकारले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई करून आंदोलन मागे घेण्याची विनंती ग्रामस्थांना केली होती. त्यानुसार कचरा शहरातच जिरवावा, या अटीवर महापालिकेला ग्रामस्थांनी ९ महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, या शिष्टाईनंतरही दोन महिन्यांपासून एकही कचरागाडी पालिकेने डेपोवर पाठविली नव्हती.
शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यातील ६०० ते ७०० टन ओला कचरा पालिकेकडून जिरविला जात आहे. तर, २०० ते ३०० टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र, त्यानंतर उरलेला ४०० ते ५०० टन सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेच्या जागा नसल्याने हा कचरा उचलणे महापालिकेने मागील आठवड्यापासून बंद केले होते. त्यामुळे शहरात ५ ते ६ हजार टन कचरा पडून होता. यामुळे रोगराईची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज याबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती. महापालिका अधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास अनुमती दर्शविल्याचे धनकवडे यांनी सांगितले. दरम्यान, काल झालेल्या पावसामुळे शहरातील सुका कचरा ओला झाल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुर्गंधी वाढत असून, रोगराईचा प्रसार होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, आमदार योगेश टिळेकर यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने प्रवीण कामठे, संजय हरपळे, अशोक हरपळे, कैलास ढोरे यांच्यासह रणजित रासकर व ग्रामस्थ उपस्थित होते. तर, दोन्ही गावांचे संरपंच अथवा इतर कोणीही पदाधिकारी नव्हते. त्यामुळे या चार ग्रामस्थांनी परवानगी दिली असली, तरी उद्या इतर नागरिकांनी नकार दिल्यास पुढे काय, यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे इतर ग्रामस्थ उद्या काय भूमिका घेणार, याकडे महापालिका प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.

या बैठकीसाठी दोन्ही गावांचे सरपंच तसेच पदाधिकारी यांना चार दिवसांपूर्वीच निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतरही केवळ चार ते पाचच ग्रामस्थ बैठकीस उपस्थित राहिले. इतर ग्रामस्थांचा विरोध असेल, तर त्यांनी आज बैठकीस येऊन आपली बाजू मांडणे आवश्यक होते. मात्र, कोणीही आलेली नाही. त्यामुळे पालकमंत्री बापट यांनी दिलेल्या आदेशानुसारच कचरा टाकण्यात येत आहे. त्यानंतर कोणी विरोध केल्यास आणि कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाल्यास पालकमंत्री बापट यांनीच त्यावर तोडगा काढून अंतिम निर्णय घ्यावा. महापालिकेच्या मुख्य सभेने ग्रामस्थांनी महापौरांचा अपमान केला म्हणून लेखी माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र, हा प्रश्न गंभीर असल्याने आपण स्वत: एक पाऊल मागे घेऊन ग्रामस्थांची भूमिका समजून घेतली आहे.
- दत्तात्रय धनकवडे, महापौर

चर्चेअंती त्यांनी मंगळवारपासून ५०० ते ६०० टनांपर्यंत कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी संमती दर्शविली आहे. त्यानुसार, तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार, डेपोवर केवळ सुका कचरा आणि इनर्ट वेस्टच कॅपिंगसाठी पाठविले जाईल. कोणत्याही स्वरूपात इतर कचरा डेपोवर पाठविला जाणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाईल.
- सुरेश जगताप,
घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख

पालिकेने लावली ८० हजार टन कचऱ्याची विल्हेवाट
४उरूळी देवाची येथील कचरा डेपोत गेल्या दोन महिन्यांपासून कचरा टाकणे बंद असतानाही महापालिकेने ८० हजार टन कचऱ्याची यशस्वी विल्हेवाट लावली आहे. उरुळी ग्रामस्थांच्या आंदोलनाचा महापालिकेवर सकारात्मक परिणाम झाला. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यातील तब्बल ६५ टक्के कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात पालिकेला यश आले आहे. तर, या दोन महिन्यांच्या कालावधीत १०० टक्के ओला कचरा पालिकेने शेतकऱ्यांच्या मदतीने यशस्वीरीत्या जिरवला आहे.
४कचरा डेपोविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले असले तरी, १ जानेवारी ते १ मार्च २०१४ या दोन महिन्यांच्या कालावधीत पालिकेने काहीच कचरा डेपोमध्ये टाकलेला नाही.
४शहरात रोज सरासरी १,५०० ते १,६०० टन कचऱ्याची निर्मिती होते. हे पाहता, शहरात गेल्या दोन महिन्यांत जवळपास ९० हजार टन कचरा निर्माण झाला.
४या कचऱ्यातील २३ हजार टन कचरा पालिकेच्या जिल्ह्यातील ७५ किलोमीटरच्या हद्दीतील शेतकऱ्यांना दिला. तर, १८ हजार टन कचरा महापालिकेचे बायोगॅस, दिशा आणि अंजिक्य प्रकल्प तसेच रोकेम या प्रकल्पांमध्ये जिरविण्यात आला.
४उर्वरित ४० हजार टन सुक्या कचऱ्यातील कागद तसेच प्लॅस्टिकच्या रिसायकलिंगसाठी, जिल्ह्यातील मोठ्या कंपन्यांच्या बॉयलरसाठी, उसाच्या गुऱ्हाळासाठी पाठविण्यात आला. काही हजार टन सुका कचरा पालिकेच्या जागांमध्ये आणि प्रकल्पांच्या ठिकाणी साचविण्यात आला आहे. त्यानंतर उरलेला ८ ते १० हजार टन कचरा गेल्या आठवडाभरापासून शहरात पडून असून, तो आता डेपोत दररोज ५०० टन याप्रमाणे पाठविण्यात येईल.

Web Title: The trash of the city bursts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.