गणेशोत्सवात स्वयंसेवकांचे प्रशिक्षण उपयुक्त होईल - नीलम गो-हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 22:21 IST2017-08-18T22:21:10+5:302017-08-18T22:21:29+5:30
पुणे शहरातील गणेशोत्सव, नवरात्र निर्धोकपणे पार पडण्याकरिता स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांची मदत होईल. या करिता त्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून पोलिसांना मदतीसाठी ते तयार आहेत, असे प्रतिपादन आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आज येथे केले.

गणेशोत्सवात स्वयंसेवकांचे प्रशिक्षण उपयुक्त होईल - नीलम गो-हे
पुणे, दि. 18 - पुणे शहरातील गणेशोत्सव, नवरात्र निर्धोकपणे पार पडण्याकरिता स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांची मदत होईल. या करिता त्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून पोलिसांना मदतीसाठी ते तयार आहेत, असे प्रतिपादन आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आज येथे केले. संस्थेच्यावतीने या उत्सवांच्या काळात पुणे शहरात स्वयंसेवक नेमण्यात येतात. त्यांचे काम अधिक चांगल्या रीतीने होण्यासाठी त्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते. हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा अशी अपेक्षादेखील यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
आपत्तीच्या वेळी फोटो काढण्याऐवजी मदत करावी. कोणत्याही अनोळखी, आकस्मिक ठिकाणी सेल्फी न घेता अशा अनावश्यक सेल्फींचा मोह टाळावा. या काळात पावसाळी वातावरणात सुरक्षित पणे वावरून ठिकठिकाणी असलेल्या उघडया तारांपासून दूर रहावे. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाइलचा अनावश्यक वापर टाऴावा. कोणत्याही दुर्दैवी घटनेच्या वेळी एखाद्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक लागत नाही तर घाबरून जाऊ नये, अशा वेळी मोबाईलवर साधा संदेश अथवा संपर्क करण्यासाठी दूरध्वनीचा वापर केल्यास मनातील भीती आणि काळजी सहज दूर होते. स्वयंसेवकांनी उत्सवांच्या काळात आपल्या भागातील परिस्थितीचा आढावा घ्यावा, आवश्यक प्रसंगी संस्थेशी संपर्क करावा.
मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिका-यांना महिला कायद्यांबाबत संवेदनशीलता वाढविण्याकरिता प्रशिक्षित करण्यात मुंबई पोलीस उपायुक्त श्री. दीपक देवराज यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे गो-हे यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. यावेळी पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी सुरक्षितता विषयावर माहिती दिली.
येत्या २३ ऑगस्ट रोजी संस्थेत सकाळी ११ ते २ या वेळेत या प्रशिक्षित स्वयंसेवकांना ओळखपत्र वितरण करण्याचा कार्यक्रम होईल. ज्यांचे प्रशिक्षण झाले आहे अशाच महिलांना ही ओळखपत्रे देण्यात येतील. त्या अनुषंगाने केंद्राच्या कार्यालयात ज्योती कोटकर, अनिता शिंदे, विभावरी कांबळे, शेलार गुरुजी आणि अश्विनी शिंदे यांची समिती तयार करण्यात आली आहे. स्वयंसेवकांनी त्यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.