तळेगाव दाभाडे : गणेश विसर्जन उरकून गावाहून मुंबईकडे जाणाऱ्या दोन पिकअप टेम्पोला ट्रेलरची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एका चिमुरड्यासह पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात तळेगाव चाकण महामार्गावरील माळवाडी येथे रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झाला. अपघातानंतर ट्रेलर चालक वाहनासह पसार झाला. जखमींना तळेगाव स्टेशन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.शालूबाई विष्णू गुंड (वय ६७, रा. कामवठे, पनवेल, नवी मुंबई, मूळ रा. वडगाव दर्या, ता. पारनेर जि. अहिल्यानगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा स्वप्निल विष्णू गुंड (वय ३४) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे त्याच्यावर उपचार करणारे डॉ. अजित माने यांनी सांगितले. स्वप्निल गुंड हा पिकअप चालक आहे. संदेश हरिश्चंद्र ढेरे (१९), रंगनाथ गंगाराम आहेर (३६), शीतल रंगनाथ आहेर (३४ वर्षे), शिवांश रंगनाथ आहेर (वय- ५ वर्षे, सर्व रा. कामवठे, पनवेल, नवी मुंबई, मूळ रा. आणे, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अपघातातील अन्य जखमींची नावे आहेत.
ट्रेलरच्या बाहेर आलेल्या लोखंडी सामानाने पिकअप टेम्पोला फरफटत नेले. ट्रेलरमधील लोखंडी सामान रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. या भीषण अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली. या अपघातात पिकअप टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
गुंड, आहेर, ढेरे कुटुंबावर काळाचा घाला:गुंड, आहेर, ढेरे परिवारातील सदस्य आळेफाटा येथून मुंबईकडे दोन पिकअप टेम्पोमधून चालले होते. व्यवसायानिमित्त ते मुंबईला स्थायिक आहेत. गणेशोत्सवानिमित्त ते गावी आले होते. गावाहून मुंबईकडे जात असता माळवाडी या ठिकाणी पिकअप टेम्पो आला . मात्र त्याचवेळी मध्यरात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला.या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या दहा वर्षांत या महामार्गावर एक हजारहून अधिक जणांचे हकनाक बळी गेले आहेत. तर काही जण जायबंदी झाले आहेत. किरकोळ अपघातांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. मात्र त्याची नोंद होत नाही. महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या या चारपदरी रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण व्हावे . त्यामुळे या ५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील कामगार, विद्यार्थी आणि वाहनचालकांना दिलासा मिळेल.- दिलीप डोळस, उपाध्यक्ष, तळेगाव- चाकण शिक्रापूर महामार्ग कृती समिती