खंडाळा बोरघाटातील क्रेन बाजूला करण्यात यश, एक्स्प्रेस वेवरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 22:02 IST2017-10-02T19:24:49+5:302017-10-02T22:02:17+5:30
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोेरघाट चढताना बोरघाट पोलीस चौकी ते अमृतांजन पुलादरम्यान एका ट्रेलरची जिपला धडक बसून ट्रेलर रस्त्यात फिरल्याने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झालीय.

खंडाळा बोरघाटातील क्रेन बाजूला करण्यात यश, एक्स्प्रेस वेवरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ सायंकाळी सात वाजता अपघातग्रस्त होऊन रस्त्यात फिरलेली अवजड क्रेन (पुलर) मार्गावरून बाजुला करण्यात नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस यंत्रणेला यश आले अाहे. मात्र अपघातानंतर वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
खंडाळा बोरघाट चढत असताना अवजड क्रेनचा एक्सल तुटल्याने सदर क्रेन ही मागे सरकत आली. यावेळी मागे असलेली होंडा सिटी कार क्रेनच्या खाली अडकल्याने हा अपघात झाला. अपघातात कारमधील तीन जण गाडीत अडकले होते. बोरघाट पोलीस, देवदूत पथक व अपघातग्रस्तांच्या मदतीला या ग्रुपच्या सदस्यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर बोरघाट पोलीस व आयआरबीच्या पथकाने अवजड क्रेन दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाजूला केली.
नऊ वाजता वाहतूक सुरू झाली असून, तासाभरात वाहतूक पूर्वपदावर येईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोेरघाट चढताना बोरघाट पोलीस चौकी ते अमृतांजन पुलादरम्यान एका ट्रेलरची जिपला धडक बसून ट्रेलर रस्त्यात फिरल्याने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर पुण्याच्या दिशेने येणारी वाहने छेद रस्त्यावरून मुंबई मार्गिकेने वळविण्यात आल्याने मुंबईकडे जाणार्या वाहनांच्या देखील रांगा लागल्या होत्या. बोरघाट चौकीलगतच हा अपघात झाला आल्याने मदत यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानं ट्रेलर बाजूला करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. मात्र वाहतूक पूर्ण ठप्प झाल्याने पुण्याकडे येणार्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.