पुणे : नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये दुचाकीवर सहभागी झालेल्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस मेहरबान झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने दुचाकीस्वार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते खरे; परंतू यातील बहुतांश चालकांच्या डोक्यावर हेल्मेटच नव्हते. एरवी सर्वसामान्य नागरिकांच्या मानगुटीवर बसून दंड वसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून रॅलीत सहभागी झालेल्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. शहरात सध्या चौकाचौकामध्ये घोळक्यानेच वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. सध्या शहरात हेल्मेट कारवाईवरच सर्वाधिक भर देण्यात येत असून यामधून लाखो रुपयांची दंड वसुली केली जात आहे. वास्तविक सर्वसामान्यांनी या कारवाईचा धसका घेतल्यासारखी स्थिती शहरात आहे. याविषयी वाहनचालक आणि नागरिकांमधून नाराजीचा सूर सतत उमटत असतो. कारवाई करताना नागरिकांची कोणतीही आर्जवं ऐकून न घेणाऱ्या वाहतूक पोलिसांनी खासदार बापट यांच्या रॅलीतील विना हेल्मेट वाहनचालकांना मात्र रान मोकळे सोडले. या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार किंवा नाही याबाबत साशंकता आहे. परंतू, वाहतूक पोलिसांची सर्वसामान्यांवर चालणारी ‘दंड’गाई राजकीय कार्यकर्त्यांपुढेही चालणार हा प्रश्न आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
खासदारांच्या रॅलीतील ‘विना हेल्मेट’ चालकांवर वाहतूक पोलीस मेहरबान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 12:39 IST
शहरात सध्या चौकाचौकामध्ये घोळक्यानेच वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत आहेत.
खासदारांच्या रॅलीतील ‘विना हेल्मेट’ चालकांवर वाहतूक पोलीस मेहरबान
ठळक मुद्देशहरात सध्या चौकाचौकामध्ये घोळक्यानेच वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत आहेत.