पुणे : गेल्या दाेन दिवसांपासून पुणे शहराला पावसाने अक्षरशः झाेडपून काढले. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले तर काही ठिकाणी वृक्ष काेलमडून पडले. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले हाेते. सर्वत्र माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. ज्या पावसात साधे उभे राहणे देखील अवघड हाेते त्या पावसात पुण्यातील सादलबाबा चाैकामध्ये एक वाहतूक पाेलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत हाेता. मुसळधार पावसामध्ये त्याने आपले कर्तव्य बजावले. त्याच्या या कर्तुत्वाचे आता नागरिकही काैतुक करत आहेत.
मंगळवारी रात्री पावसाला जाेरदार पावसाला सुरुवात झाली. शहरात सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रस्त्यावर पाणीच पाणी झाले हाेते. पुण्यातल्या येरवडा भागातील सादलबाबा हा माेठा चाैक आहे. या ठिकाणी शहरातील विविध भागातून वाहने येत असतात. त्यामुळे दरराेज माेठी वाहतूक काेंडी या ठिकाणी हाेत असते. मुसळधार पावसामुळे समाेरचे दिसणे अवघड जात हाेते. अशातच येरवडा वाहतूक विभागाचे पाेलीस कर्मचारी थाेपटे हे कसलाही विचार न करता मुसळधार पावसात आपले कर्तव्य बजावत हाेते. त्यांचे हे काम पाहून वाहनचालकांना देखील आपली काळजी घेण्यासाठी काेणीतरी रस्त्यावर आहे याचे समाधान वाटले. तसेच अनेकांनी त्यांच्या कामगिरीला मनाेमन सॅल्युट केला.
याबाबत पुण्यातले हवाई वाहतूक तज्ञ तसेच पुणे वाहतूक पाेलिसांसाेबत रस्ते सुरक्षासाठी काम करणारे धैर्यशिल वंडेकर यांनी थाेपटे यांचा फाेटाे शेअर करत त्यांचे काैतुक केले आहे. लाेकमतशी बाेलताना वंडेकर म्हणाले, जाेराचा पाऊस असताना कठीण परिस्थितीमध्ये देखील थाेपटे आपले कर्तव्य बजावत हाेते. एवढ्या पावसात समाेरचे दिसणे कठीण झालेले असताना माेठ्या चाैकात ते वाहतूक नियमन करत हाेते. त्यांचे कर्तव्य त्यांनी प्रामाणिकपणे केले याचे काैतुक वाटले. त्यामुळे त्यांच्या फाेटाे शेअर केला. लवकरच त्यांच्या या कामगिरीबद्दल मी त्यांच्या वैयक्तिक सत्कार करणार आहे.