कचऱ्यामुळे होतेय वाहतूककोंडी

By Admin | Updated: October 15, 2016 05:40 IST2016-10-15T05:40:33+5:302016-10-15T05:40:33+5:30

खराडीतील हॉटेल रॅडिसन चौकात सतत रस्त्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गेल्या वर्षभरापासून निर्माण झाली

Traffic drivers due to the trash | कचऱ्यामुळे होतेय वाहतूककोंडी

कचऱ्यामुळे होतेय वाहतूककोंडी

चंदननगर : खराडीतील हॉटेल रॅडिसन चौकात सतत रस्त्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गेल्या वर्षभरापासून निर्माण झाली आहे.
खराडीतील प्रभाग क्रमांक १९च्या मुख्य चौकात रस्त्यात कचरा गेल्या वर्षभरापासून टाकला जात आहे. याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना, व्यावसायिकांना होत आहे. खराडीतील चौकातून चंदननगरला जाणाऱ्या मार्गावर रस्त्यात बेजबाबदार नागरिकांकडून रात्रीच्या वेळी हा कचरा टाकला जात आहे.
या चौकात सततच्या वाहतूककोंडीमुळे दोन महिन्यांपूर्वी सिग्नल बसविण्यात आले आहेत. तरी सुद्धा याठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच चौकातून हडपसर, खराडी एमआयडीसी, आयटी पार्ककडे रस्ता जातो. त्यामुळे मोठी वाहतूक या रस्त्यावरून होत असते. बायपास ते हडपसर हा मुख्य रस्ता मोठा आहे. मात्र खराडी ते चंदननगर हा रस्ता केवळ तीसच फुटी असल्याकारणाने या रस्त्यावर मात्र कचरा टाकला जात आहे.
तीस फुटाच्या रस्त्यात दहाहून अधिक फूट कचरा पडलेला असतो. त्यामुळे खराडी ते चंदननगरच्या बाजूच्या वाहनांना रस्ताच उरत नाही. त्यामुळे ती वाहने चुकीच्या व आडव्या तिडव्या पद्धतीने घातल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. वाहनचालकांत दररोज वाद होत आहेत. कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला
आहे.
येथील कचरा मध्यरात्री टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता तो उचलला जाते. मात्र त्याठिकाणी स्वच्छता न केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
याबाबत महापालिका आरोग्य विभागाला वारंवार कळवूनही पालिकेचे आरोग्य अधिकारी या तक्रारींची दखल घेत नसल्यामुळे चौकाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.
या चौकात अतिशय सुंदर मोठे प्रशस्त रस्ते, थ्री स्टार, फाईव्ह स्टार पंचतारांकित हॉटेल आहेत. मात्र या कचराकुंडीमुळे चौकाची शोभा गेली आहे. तसेच पावसामुळे रस्त्यावर
पाणी साचले की दुर्गंधी असह्य
होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कचरा उचलण्यासाठी जे मोठे ट्रक आहेत ते कमी असून, ५ बीआरसी, १७ घंटागाड्या, कंटेनर ठेवण्यासाठी ४ डीपी टेम्पो असून, यातील १७ घंटा गाड्या सतत नादुरुस्त असतात. दहा ते पंधरा वर्षांपूर्वीच्या या गाड्या असल्यामुळे नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे वडगावशेरी व खराडीतील कचरा नियोजन कोलमडले आहे.(वार्ताहर)

Web Title: Traffic drivers due to the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.