बारामती अनलॉकच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:52+5:302021-06-09T04:12:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या बारामतीचा प्रवास आता अनलॉकच्या दिशेने ...

बारामती अनलॉकच्या दिशेने
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या बारामतीचा प्रवास आता अनलॉकच्या दिशेने सुरू झाला आहे. मंगळवार (दि. ८) पासून बारामती शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. १५ जूनपर्यंत ही वेळ कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बारामतीत २४ तासांत केवळ ८ कोरोनाबाधित आढळले आहेत.
बारामती शहरात गेल्या तीन महिन्यांपासून असणारा कोरोनाचा आलेख घसरण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल मध्ये जवळपास दररोज ४०० च्या घरात शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधित आढळण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे कोरोनाबाधितांची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लादले होते. ५ एप्रिलपासून संपूर्ण बारामती बंद आहे. अखेर दोन महिन्यांनंतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारपासून काही वेळ का होईना दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली राहणार आहेत. तर, अत्यावश्यक वर्गातील दुकानांची वेळ आता वाढविण्यात आली आहे. किराणा, भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक सेवेअंतर्गत असणारी दुकानांची वेळ यापूर्वी ११ वाजेपर्यंत होती. आता ही वेळ मंगळवारपासून ४ वाजेपर्यंत असणार आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून व्यापार बंद आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण वाढली आहे. कामगारांचा पगार, बँकेचे व्याज, सरकारी टॅक्स, वीजबिल, टेलीफोन बिल, जागाभाडे, नगरपरिषद टॅक्स आदी खर्च सुरू आहे. त्यामुळे व्यापारी हतबल झाला आहे. बारामती शहर गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. रुग्णसंख्या घटण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र, इतर व्यवसायांना देखील कोविड नियमांच्या आणि वेळेच्या बंधनासह परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे आतातरी दुकाने सुरू करा,अशी मागणी व्यापारी वर्गाची होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या ८ आल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.
चौकट
गेल्या २४ तासांत एकूण ८ कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये शहर ५, तर ग्रामीणच्या ३ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण रुग्णसंख्या २४ हजार ६५४ वर गेली आहे. एकूण २३ हजार ३४७ रुग्ण बरे झाले आहेत. म्युकरमायकोसिसचे एकूण २१ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बारामती तालुक्यातील १४ इतर तालुक्यातील ७ आहेत. त्यापैकी ६ जणांवर उपचार सुरु आहेत.तसेच, ज्या नागरिकांचा दुसरा डोस (कोविशिल्ड) प्रलंबित आहे. पहिला डोस झाल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन) या लसीचा दुसरा डोस (२८ दिवस पूर्ण) प्रलंबित आहे. अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.