कुल विद्यालयाची केरळला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:30 IST2018-08-29T23:30:04+5:302018-08-29T23:30:24+5:30

कुल विद्यालयाची केरळला मदत
केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयातील युवक-युवतींनी केडगाव बाजारपेठेमध्ये केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून २१ हजार रुपये जमा केले. नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके पाटील, सचिव धनाजी शेळके, प्राचार्य डॉ. गोविंदराजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम राबवण्यात आला. मंगळवारी आठवडेबाजाराचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी बाजारातील भाजीविक्रेते, भेळविक्रेते, धान्यविक्रेते, व्यावसायिक यांच्याकडून लोकवर्गणी गोळा केली.
महाविद्यालयाच्या मदतपेटीतही अनेकांनी यथाशक्ती मदत जमा केली. यावेळी प्राचार्य निंबाळकर म्हणाले, केरळ येथील पूरग्रस्तांसाठी व मयत व्यक्तींच्या कुटुंबीयाप्रती संवेदना म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे या उपक्रमाला सहकार्य म्हणून महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी एका दिवसाचे वेतन असे मिळून ३५ हजार रुपये देणार आहेत. सामाजिक बांधिलकीमधून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रा. शाम वासनिकर, डॉ. राऊत ज्ञानदेव, डॉ. महादेव थोपटे, प्रा. भाऊसाहेब दरेकर, प्रा. दत्तात्रय खराडे, डॉ. नानासाहेब जावळे, प्रा. अमोल शेलार, प्रा. गणेश निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ही घ्या माझी फुलं नाही फुलाची पाकळी
बाजारपेठेत महाविद्यालयीन युवती फिरत असताना एका भाजी विक्रेत्याजवळ मदतीसाठी आल्या. यावेळी भाजीविक्रेत्याने आपल्या खिशातील ५ हजार रुपये मदत दिली.
४युवतींनी या भाजीविक्रेत्याला नाव विचारले असता त्याने नाव सांगण्यास हात जोडून नकार दिला. आपण राष्ट्रबांधणीचे काम करत आहात, असे म्हणत भाजीपाला विक्री सुरू केली.