पाणीप्रश्नाची आजची बैठक वादळी होणार?
By Admin | Updated: February 12, 2016 03:36 IST2016-02-12T03:36:33+5:302016-02-12T03:36:33+5:30
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी ५ वर्षांमध्ये

पाणीप्रश्नाची आजची बैठक वादळी होणार?
पुणे : शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी ५ वर्षांमध्ये ८७ टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, शिवसेना यांच्याकडून तीव्र विरोध करण्यात येत असल्याने ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली आहे. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने एकत्र येऊन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शुक्रवारी विशेष सभेत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. पाणीपट्टीमध्ये २०१६-१७ या वर्षासाठी १२ टक्के, त्यानंतर
२०२१ पर्यंत पुढील ५ वर्षे प्रत्येकी १५ टक्के, त्यानंतर २०४७ पर्यंत प्रतिवर्षी ५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कुणाल कुमार यांनी बुधवारी मुंबईला जाऊन भेट घेतली. २४ तास पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावाला मनसेची मान्यता मिळावी यासाठी ठाकरे यांना गळ घातली. त्यामुळे मनसेकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे महापालिकेतील गटनेते राजेंद्र वागस्कर यांनी मनसेचा पाणीपटट्ीवाढीला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.