तब्बल साडेतीन हजार निवृत्त शिक्षकांची थकली ‘पेन्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:52+5:302021-01-13T04:27:52+5:30
पुणे : पालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये हयातभर विद्यार्थी घडविण्याचे काम केलेल्या निवृत्त शिक्षकांना आपल्या हक्काच्या ‘पेन्शन’साठी अधिका-यांकडे खेटे मारावे लागत ...

तब्बल साडेतीन हजार निवृत्त शिक्षकांची थकली ‘पेन्शन’
पुणे : पालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये हयातभर विद्यार्थी घडविण्याचे काम केलेल्या निवृत्त शिक्षकांना आपल्या हक्काच्या ‘पेन्शन’साठी अधिका-यांकडे खेटे मारावे लागत आहेत. तब्बल साडेतीन हजार वयोवृद्ध शिक्षकांची पेन्शन थकली असून, प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकारी मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. पेन्शन तर दूर परंतु, सन्मानाची वागणूक देखील मिळत नसल्याचे या शिक्षकांनी सांगितले.
निवृत्त प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कल्याण संस्थेच्या सदस्यांनी यासंदर्भात अतिरीक्त आयुक्तांची भेट घेऊन याविषयीची कैफियत मांडली. या वेळी अध्यक्ष शिवाजी शेटे, उपाध्यक्ष शिवाजी गोसावी, नगरसेवक प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते. शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचारी-अधिका-यांना दरमहा ३० तारखेला पेन्शन मिळते. तर, माध्यमिक विभागाच्या सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना दरमहा ३० तारखेलाच पेन्शन मिळते. परंतु, प्राथमिक विभागाच्या कर्मचा-यांना मात्र दर महिन्याच्या १२ तारखेची वाट पहावी लागते.
कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातही काही शिक्षकांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना पेन्शनवरच अवलंबून राहावे लागत आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रमुख मीनाक्षी राऊत यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे आणि त्यांच्याकडून उद्धट उत्तरे ऐकायला मिळत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. यासोबतच तब्बल ११० सेवानिवृत्त शिक्षकांना अद्याप पूर्ण पेन्शनच मिळालेली नाही. दरमहा त्यांच्या पेन्शनमधून १० ते २० टक्के कपात होते आहे. याचे कारणही त्यांना नीट सांगितले जात नाही. अनेक शिक्षकांच्या वैद्यकीय उपचारांची बिले देखील चार-चार वर्षे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
====
लिपिकांकडून गोंधळ
लिपिकांनी गोंधळ घालत निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या खात्यावर दोन महिने वेतन जमा केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर दुसरे कर्मचारी नेमण्यात न आल्याने या सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांची पेन्शन रखडली असल्याचे कारण देण्यात आले आहे.
====
सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शनसाठी त्रास होऊ नये हीच प्रशासनाची भूमिका आहे. एका प्रकरणामध्ये नऊ जण निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे बिले तयार करण्याचे काम रखडले आहे. अन्य कर्मचा-यांना हे काम देण्यात आले होते. परंतु, त्यांच्याकडून चुका होऊ लागल्या होत्या. आम्ही शिक्षकांना पूर्ण सहकार्य करीत आहोत. त्यांनीही सहकार्य करण्याची विनंती केली आहे. लवकरात लवकर त्यांचे पेन्शनचे काम मार्गी लागेल.
- मीनाक्षी राऊत, प्रमुख, प्राथमिक शिक्षण विभाग